नसावे नशीबात घायाळ होणे
तुझे तीर सारे पहाऱ्यात होते

श्री जयंता ५२ यांनी सुचवलेला बदल अतिशय व्यवस्थित बसतो, अर्थही घेऊन येतो. पण माझ्यामते तो मूळ शेरापेक्षा वेगळ्या अर्थाचा आहे.

तुझे तीर सारे पहाऱ्यात होते - यामध्ये तो जो कोणी 'तू' आहे त्याच्या 'प्रेयसीला घायाळ करणाऱ्या तीरांवर' समाजाच्या चालीरीतींचा पगडा/पहारा होता. त्यामुळे प्रेयसी घायाळ ( प्रेमात ) होऊ शकली नाही. ( तीर पहारा देत नव्हते तर तीर स्वतःच पहाऱ्यामध्ये होते. ) ( इथे समाजाच्या चालीरीती हे माझे अध्यारुत आहे, त्याऐवजी काही वेगळेही असू शकते. )

जरी तीर सारेच भात्यात होते - म्हणजे सगळेच तीर भात्यात असूनही घायाळ होता आले नाही असा एक वेगळा अर्थ निघतो. ( आता एखादा असेही म्हणू शकेल की भात्यात असल्यावर कसे घायाळ होता येईल, पण तो भाग वेगळा ). तसेच ते 'जरी तरी' स्वरुपाचे सपाट विधान होईल. तसेच तीर कुणाचे हा प्रश्न निर्माण व्हावा! म्हणजे बहुतेक शेर 'तू' या संवादरुपाने येत आहेत. इथे 'तू' नसल्याने 'मी घायाळ झाले नाही जरी सगळे तीर भात्यात होते' मध्ये कुणाचे तीर किंवा कुणाचा भाता हा प्रश्न निर्माण होऊ शकेल. कारण गझलेमध्ये असल्याने 'हा' शेर स्वतंत्रपणे कसा वाटतो ते बघितले जाईल.

बदल सुचवणे - श्रेष्ठ गझलकारांनी असे बदल सुचवणे हे केव्हाही गझलेच्या फायद्याचे आहेच. किंबहून ते पुरेश्या प्रमाणात होतच नाही. त्याची अनेक कारणे असावीत. पण माझे असे मत आहे की बदल हे अर्थाशी सांभाळून राहणारे/तंत्राच्या दृष्टीने/सफाईच्या दृष्टीने/ अर्थ व्यापक होण्याच्या दृष्टीने/ काव्यात्मकता येण्याच्या दृष्टीने असल्यास खूप फायदा होईल.