हल्ली उत्तरीय परीक्षेऐवजी उत्तरीय तपासणी असा शब्द जास्त प्रचलित आहे हे खरे, मात्र, त्यातला उत्तरीय शब्द मजेशीर वाटला. उत्तरीय म्हणजे उपरणे हा अर्थ माहीत आहे. पोस्ट मॉर्टेम साठी उत्तर तपासणी वा मरणोत्तर तपासणी असे शब्द वापरण्याऐवजी उत्तरीय हा शब्द का वापरत असावेत असा प्रश्न मनांत आला.
'भाषा आणि जीवन'च्या हिवाळी अंकामध्ये प्रा. दिनकर देशपांडेंच्या 'मैत्रीच्या पलीकडे' ह्या पुस्तकातून (? ) घेतलेले एक पानपूरक वाचले. त्यात त्यांनी 'शालेय' ह्या शब्दावर टिप्पणी केली आहे. शाळेसंबंधी, विद्यालयासंबंधी, विद्यालयाचे अश्या अर्थी मराठीत शालेय हा शब्द वापरला जातो. मराठीत जिथे शिक्षण दिले/घेतले जाते ते विद्यालय म्हणजे शाळा अश्या अर्थी शाळा हा शब्द मर्यादित स्वरूपात वापरला जातो. संस्कृतात मात्र शाला हा शब्द स्थान ह्या अर्थी वापरतात - उदा. अश्वशाला, गोशाला, पाठशाला वगैरे. संस्कृतात 'शालेय' ह्या शब्दाचा अर्थ होईल 'साळीसंबंधी', आणि ही साळ म्हणजे जी जिच्यापासून तांदूळ काढतात ती साळ. वगैरे.....
हे वाचल्यावर 'उत्तरीय' चेही असेच माही मर्यादित स्वरूप उत्तरीय तपासणी मध्ये झाले असावे काय? अशी शंका आली. उत्तरीय हा शब्द तपासणी संबंधात विचित्र वाटतो खरा.
क्वारंटाईन वॉर्ड ह्या अर्थी निरोधाविभाग असा शब्द पुस्तकांत आला आहे. त्यात निरोध आणि विभाग ह्या शब्दादरम्यान अतिरिक्त अ/आ कुठून आला? निरोधविभाग असा शब्द जास्त योग्य ठरला असता असे वाटले. की ही टंकलेखनातील चूक असावी?
अभियुक्त चा अर्थ कैदीपेक्षा आरोपी असा असावा. तुरुंग ह्या अर्थी पुस्तकार सर्वत्र बंदीगृह असा शब्द वापरला आहे, त्यामुळे कैदी म्हणजे बंदी आणि अभियुक्त म्हणजे आरोपी असे असावे. आरोप/आरोपी ह्या शब्दाचे मूळ कोठे आहे? हा अरबी/फार्सीतून आलेला शब्द आहे का? (रोप/रोपटे, आरोप, निरोप ह्यामध्ये काही समान सूत्र वगैरे आहे का?)