'आरोप' म्हणजे पेरणे, लावणे, बसवणे इ. 'दोषारोप' म्हणजे दोष लावणे. न्यायालयीन संदर्भात 'आरोप' हे 'दोषारोप' अशा अर्थी वापरले जाते; किंबहुना या संदर्भात ते 'दोषारोप'चे लघुरूप म्हणून वापरले जाते असेही म्हणता येईल.

'आरोप' संस्कृतोद्भवच.

कदाचित मराठीकरणाच्या नावाखाली संस्कृतीकरणाच्या अतिउत्साहात 'आरोप' किंवा 'आरोपी' हे साधेसोपे, प्रचलित मराठी शब्दसुद्धा संस्कृतोद्भव (किंबहुना 'आरोप'च्या बाबतीत तत्सम) आहेत याचे विस्मरण होऊन 'आरोपी'साठी 'अभियुक्त' असा बोजड शब्द योजला असू शकेल. कधीकधी नाकाखालच्या गोष्टी (इंग्रजीतून या वाक्प्रचाराची उचलेगिरी करून) दिसत नाहीत याचे कदाचित हे उत्तम उदाहरण असावे.

किंवा दुसरी शक्यता म्हणजे 'फिर्याद', 'फिर्यादी' या फारसी (? ) उगम असलेल्या शब्दांचे संस्कृतीकरण केल्यानंतर उत्साहाच्या भरात 'आरोप' किंवा 'आरोपी'चेसुद्धा संस्कृतीकरण करण्याची गरज नाही, ते मुळातच संस्कृतोद्भव शब्द आहेत, याचे विस्मरण झाल्यानेही असे झाले असू शकेल.

प्रत्यक्षात काय घडले ते केवळ करणाऱ्यांना आणि साक्षी परमेश्वराला माहीत. आपल्या हातात केवळ तर्क करणे राहते.