हात केळी खायला गेले होते का? - ही गोष्ट राग आलेल्या माणसाला तत्क्षणी इतर काहीही न सुचल्यामुळे सुचलेले असण्याची शक्यता आहे. 'केळी खाणे' हे बावळटपणाचे किंवा 'मेंगळटपणाचे' लक्षण मानले असावे त्या माणसाने!

पायजमा - पायजमा हा वस्त्रप्रकार 'घातलेला नसतो' तेव्हा अत्यंत 'तिरस्कारजनक' वाटत असावा. घातल्यावर 'घालणारा' तसा दिसत असावा. इतर वस्त्रप्रकार म्हणजे शर्ट, पँट वगैरे पडलेले असले तरी अगदीच बकवास दिसत नाहीत. एखाद्या ठिकाणी पायजमा पडला असेल तर उगीचच तो ज्याचा आहे त्याचा अन त्या पायजम्याचाही राग येत असावा. पायजमा घालणारे पुरूष फारसे काही करत नाहीत किंवा निष्क्रिय असतात ( काही विशिष्ट बाबतीत किंवा क्षेत्रात ) असाही एक समज निगडीत असू शकतो. पायजम्यावर ज्या पारंपारिक रंगांच्या रेघोट्या असतात त्याने अत्यंत तल्लख माणूसही पुरेसा बावळट दिसू शकतो. ते रंग पायजम्यासाठी कुणी शोधले असावेत यावर एक संशोधन झालेले माझ्या वाचनात आहे. त्या माणसाला पुढे पी. एच. डी मिळाली. ( त्याचा घटस्फोट झाला ही एक अवांतर माहिती ). लेंगा हा पायजम्याचा अर्बन भाऊ आहे. लेंगा पांढरा असल्यामुळे व्यक्तिमत्वाला एक सभ्यतेची झालर येऊ शकते. काही जण याच मूलभूत कारणासाठी लेंगा वापरतात असेही पुरावे आहेत. माणूस आहेस का लेंगा असा प्रश्न त्याचमुळे विचारला जात नाही.