ज्ञानाच्या चार पायऱ्या सांगितल्या जातात-
- मला हे माहित नाही, की मला काय माहित नाही! पहिली पायरी! जर काय माहित असायला हवे हेच कळले नाही तर? पूर्ण अंध:कार! बरेच लोक याच पायरीवर ठेचकाळतात.
- मला माहित आहे, मला काय माहित नाही! येथे जाणीव झाली की कोणत्या गोष्टी मला माहित असायला हव्यात. आता जिज्ञासा जागृत झाली. मला पोहायला यायला हवे याची जो पर्यंत जाणीवच नव्हती तो पर्यंत काहीच घडत नव्हते. आता प्रगतीकडे वाटचाल सुरू झाली! ही दुसरी पायरी.
- मला माहित आहे, हेच मला माहित नाही! मला पोहायला येतय हो, पण विश्वास वाटत नाही. आत्मविश्वासाचा अभाव! अर्थात परिणामाच्या दृष्टीने शून्य! ही तिसरी पायरी!
- मला माहित आहे की मला काय माहित आहे. ही चौथी पायरी! आपणाजवळ असणाऱ्या ज्ञानाची, कौशल्याची- आणि म्हणूनच सामर्थ्याची पूर्ण जाणीव! येथे सारा आत्मविश्वास प्रकट होतो. मी माझ्या पुऱ्या क्षमतेने समोर येणाऱ्या समस्यांना भिडू शकतो! यश-अपयशाची पर्वा न करता! कै. रे. ना.वा. टिळकांच्या शब्दात सांगायचे तर- 'मी जाणतो माझे बल!'
ज्याला आपली बलस्थाने (स्ट्राँग पॉइंट्स) , मर्यादा किंवा मर्मस्थाने (विक पॉईंट्स), उमजतात, तोच संधीं (ऑपॉर्च्युनिटीज) नेमक्या हेरू शकतो, आणि आपल्या अस्तित्वाला लागलेली प्रश्नचिन्हे (थ्रेट्स) मिटवू शकतो. हे करताना तो आपल्या बलस्थानांचा कुशलतेने वापर करेल; मर्यादा वाढवत नेईल. आत्मविश्वास असा चमत्कार घडवू शकतो!