त्यामुळे आरोपी आणि मधुमेही असे शब्द, कदाचित मूळ संस्कृतमध्ये नसले तरी, बनवायला काहीच हरकत नाही. त्यांतला ई हा प्रत्यय इंग्रजी आहे असे समजणे निखालस चूक आहे.
न्यूज फ्लॅश - "आरोपी" आणि "मधुमेही" हे शब्द आधीच बनले आहेत आणि तुमची परवानगी, माझी हरकत याची पर्वा न करता लोक वापरतही आहेत. आता हे शब्द कुठल्या पद्धतीने आले इतकीच चर्चा करणे आपल्या हातात आहे.
"आरोपी" आणि "मधुमेही" मधला ई हा प्रत्यय इंग्रजी ई सारखा आहे हे माझे मत आहे. आपल्या मते ते चूक आहे. तरी पण माझा तर्क सांगतो.
"आरोपी" हा शब्द "एंप्लॉई" आणि "असेसी" या इंग्रजी शब्दांप्रमाणेच म्हणजे "ज्याच्यावर आरोप झाला तो" अशा अर्थाने वापरला जातो. माझ्या अल्पज्ञानाप्रमाणे संस्कृत आणि मराठीत असे शब्द बनताना त्याला ईत प्रत्यय लागतो. जसे शाप - शापित, मोह - मोहित. आणखी एक चांगले उदाहरण बलात्कार शब्दाचे. बलात्कारी (पुरूष) म्हणजे "ज्याने बलात्कार केला तो" आणि बलात्कारित (स्त्री) म्हणजे "जिच्यावर बलात्कार झाला ती". "आरोपी"च्या हिशोबाने त्या स्त्रीला "बलात्कारी" स्त्री म्हणावे लागेल. तसे नसेल तर श्री. महेश यांनी सुचवल्याप्रमाणे "आरोपी"चा अर्थ "ज्याने आरोप केला तो" हा योग्य समजला पाहिजे. पण रूढ अर्थ तसा नसून "ज्याच्यावर(जिच्यावर) आरोप केला गेला आहे तो" असा इंग्रजी पद्धतीचा आहे. म्हणून मी हा ई प्रत्यय इंग्रजीवरून आला असे म्हटले आहे. मराठी- संस्कृतप्रमाणे "आरोपी" चूक असून "आरोपित (किंवा आरोपिन्)" असा शब्द बरोबर असायला हवा होता. जुन्या साहित्यात आरोपी, मधुमेही असे शब्द का येत नसावेत?
दुसरे म्हणजे मराठीत "प्रेमी" हा शब्द "एकमेकांवर प्रेम करणारे" या अर्थाने वापरतो. कदाचित् प्रेमिक हा जास्त योग्य शब्द असेल. पण जर "प्रेमी" म्हणजे "प्रेम करणारा (री/रे)" तर "आरोपी" म्हणजे "आरोप करणारा (री/रे)" असे का नसावे?
मी पुरेशा युक्तिवादाने माझे मत मांडले आहे असे वाटते.
विनायक