लेखाची सुरवात आपल्याला हवी तशी, असत्यावर आधारीत अशीच ( गढूळ व चूकीची) करून....." -

श्री. सतीश रावलेनी मी सारा लेख गढूळ करून टाकल्याचा आरोप केला आहे. त्याला आता सविस्तर उत्तर देणे भाग आहे. प्रथम एक गोष्ट स्पष्ट करायला हवी. मी काही संस्कृतचा जाणकार नाही. थोडी फार मराठी जाणतो; त्याच अनुषंगाने जेवढा संस्कृतचा संबंध आला तेवढाच! त्यामुळे काही नवीन समोर येत असल्यास त्याचे स्वागतच!

१. रावले म्हणतात- सत्य शब्द हा शब्द सत् पासून बनला नाही. मग कशापासून बनला ते त्यांनी सांगितलेच नाही. सत् चा अर्थ त्यांनी "जे जसे आहे तसे" असा सांगितला आहे. मी कै.ज. वि. ओक यांनी लिहलेला संस्कृत-मराठी कोश काढून पाहिला. त्यांनी दिलेले सत् चे अर्थ असे आहेत- १. असणारे २. खरे ३. चांगले ४. योग्य, पूज्य,सुंदर ५‌. सद्गुणी

म्हणजेच सत् चा मी चांगला हा दिलेला अर्थ बरोबर आहे.

२. सत् चा अर्थ 'असणारे' आहे हे मला माहित नव्हते. रावल्यांचा मी ऋणी आहे. पण माझ्या "सत्य" बाबतच्या विवेचनात मी सत्  चा अर्थ चांगले असा घेणे योग्य नाही असीच प्रतिपादन केले आहे. आणि "जे जसे आहे तसे"  तेच सांगणे म्हणजे सत्य कथन असे म्हटले आहे. म्हणजे योगायोगाने का होईना, मी नेमकेच सांगितले आहे.

३. श्री. ज. वि. ओकांच्या कोशात आणि कृ. पां कुलकर्णींच्या व्युत्पती कोशात सत्य चा अर्थ खरेपणा, सचोटी, प्रामाणिकपणा असा दिला आहे.

४. सदाचरण शब्दात मी म्हणतो तसे सत् + आचरण असे नसून सद् + आचरण असे आहे असे रावल्यांचे मत आहे. पुनः साक्ष ओकांचीच! त्यांनी माझ्या म्हणण्याला पुष्टी देत सत् + आचार अशीच फोड दिली आहे.

(जाताजाता- याच शब्द कोशात सद् असा शब्द सापडला; त्याचा अर्थ आहे -खेकडा!)

 ५. पण  तरी ही सत्याचा आग्रह किती धरावा ही विवेकाची बाब!   - या वाक्यामुळे रावले चिंतेत पडले; त्यांना मी उलटा प्रवास सुरू केला असे वाटले. वस्तुतः  मी येथे "सद्गुण-विकृती" ची बाब मांडली आहे. ती बहुदा त्यांना उमगलीच नसावी!

६. " सत्य" हे जसे काल सापेक्ष आहे, तसेच ते व्यक्तिसापेक्ष देखील आहे. सात आंधळ्यांच्या गोष्टीतील प्रत्येक जण खरे बोलत होता; पण प्रत्यक्षात स्थिती काही वेगळीच होती. ही बाब प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवी. "मी म्हणतो तेच बरोबर" अशी दुराग्रही भूमिका घेणे परवडणारे नसते. जे नवे समोर येईल ते पारखून घेऊन स्वीकारायला हवे! अन्यथा मग विविध धर्माधर्मात चालणारी सुंदोपसुंदी थांबणारच नाही.