शब्दकोशाचा प्रकाशन समारंभ आज डॉ. प्रमोद तलगेरी यांच्या हस्ते झाला. अध्यक्षस्थानी मधू मंगेश कर्णिक होते. व्यासपीठावर मागच्या बाजूस मोठा कापडी फलक होता. त्यावर उद्यान प्रसाद कार्यालय असे लिहिले होते. प्रत्यक्षात कार्यालयाचे नाव उद्यान कार्यालय आहे असे समजले. ज्या इमारतीत कार्यालय आहे तिचे नाव उद्यान प्रासाद. महाराष्ट्र टाइम्समध्येसुद्धा आजच्या कार्यक्रमात कार्यालयाचे नाव उद्यान प्रसाद म्हणूनच छापले होते. नक्की नाव जर संबंधितांनाच माहीत नसेल तर मी उद्यान प्रसाद म्हटले असले तर आश्चर्य नाही.
प्रमोद तलगेरींचे भाषण अप्रतिम झाले. विशुद्ध मराठीत. अधूनामधून ग्रीक आणि जर्मन शब्द वापरले तरी दुसऱ्याच क्षणी त्या शब्दांचे ते सहजगत्या मराठी रूपान्तर करीत होते. त्यांचा परिचय करून देताना कोशाचे मुख्य संपादक डॉ. रामदास डांग्यांनी त्यांना डॉ. राधाकृष्णन नंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा विद्वान असे म्हटले, याचा थोडासा प्रत्यय त्यांचे भाषण ऐकताना आला..
प्रकाशनानंतर शब्दकोशाचा तो पहिला खंड(अ ते औ पर्यंत) तिथे विक्रीला होता. छापील किंमत २९० रुपये. दहा टक्के सवलतीने रुपये २६१. यापुढे जिथे सरकारी प्रकाशने विक्रीला असतात तिथे तो मिळेल. मला काही खास वाटला नाही म्हणून मी खरेदी केला नाही. (दाते-कर्वे कोशाइतका नक्कीच चांगला नाही.) सर्व खंड प्रकाशित झाल्यावर विचार करता येईल.