मुळात या सगळ्या प्रकारामागचे नेमके उद्दिष्ट काय होते? परभाषेतील पारिभाषिक शब्द सामान्य लोकांना समजत नाहीत म्हणून त्याजागी स्वभाषेतले लोकांना सहज समजतील (ज्यायोगे व्यवहारात लोकांची अडचण होणार नाही) असे प्रतिशब्द योजणे,  की काही शब्दांचे ते केवळ परभाषेतून आलेत म्हणून (मग ते लोकांना न समजणारे असोत किंवा समाजात रुळून सर्वांना कळणारे असोत)  भाषेतून उच्चाटन करून त्याजागी संस्कृतातून ओढूनताणून आणलेले तितकेच दुर्बोध  (किंवा रुळलेल्या परभाषीय शब्दांच्या बाबतीत अधिक दुर्बोध) शब्द  समाजाच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न करणे? आणि तेही केवळ कोणालातरी वाटले म्हणून? ('आलात तर तुमच्यासह, नाहीतर तुमच्याविना... ही मराठी भाषा खड्ड्यात - चुकलो, गर्तेत - लोटणारच! ')

सामान्य माणसाला 'अभियोजक' म्हटले तर काहीही कळत नाही. (तो शब्द कदाचित चुकीचा असू शकेल हेही कळत नाही. ) 'वकील' म्हटले की 'हा लेकाचा उद्या माझी केस कोडतात लढणार आहे' हे लगेच कळते. सामान्य मराठी माणसाला कळतो म्हणजे हा शब्द मराठीच. मग तो कधीकाळी अरबीतून आला म्हणून त्याला घालवून का द्यायचा?

सामान्य माणसाला 'हेबियस कॉर्पस पेटिशन' काय किंवा 'बंदी प्रत्यक्षीकरण आवेदन' काय, सारखेच डोक्यावरून जाते. 'कैद्याला कोर्टासमोर हजर करण्यासाठी अर्ज' म्हटले तर कदाचित लवकर कळेल. मग 'बंदी प्रत्यक्षीकरण आवेदन' म्हणून नेमका कोणाचा फायदा झाला आणि भाषेची नेमकी कोणती वृद्धी झाली? (पारिभाषिक शब्द अचूक - प्रिसाइज - असावेत हे मान्य, पण म्हणून सहज कळण्यासारखे शब्द सोडून कोणालाही न कळणारे शब्द ओढूनताणून बनवलेच पाहिजेत का? )