अभिसार हा शब्द उत्तम आणि अचूक आहे, त्यात आपण काहीतरी पवित्र किंवा उदात्त करत आहोत असे वाटायचे काही कारण नाही. पण मीलनाचा संकेत या अर्थाने नुसता संकेत वापरायला काही प्रत्यवाय नसावा. संस्कृतमध्ये संकेत म्हणजे खूण, इशारा; करार, बोली; प्रियकराच्या/प्रेयसीच्या भेटीसाठी ठरवलेले स्थळ; अट, शर्त; ठराव, नियम, वगैरे. प्रत्येक शब्द स्पष्टार्थपूर्ण असलाच पाहिजे असे काही नाही. अमुक गृहस्थ गेले म्हणजे मेल्यामुळे कुठेतरी गेले हे सांगायची गरज नसते. अर्थविस्तार होऊन शब्दांच्या अर्थच्छटा हळूहळू बदलतच असतात.

आता संकुल हा शब्द घ्या. हा शब्द हल्ली आपण 'काही विशिष्ट उद्देशाने एकाच परिसरात एकत्र आलेल्या संस्थांचा गट'(कॉम्प्लेक्स) अशा अर्थाने वापरतो.  क्रीडासंकुल, व्यापारसंकुल, कुर्ला-बांद्रा संकुल वगैरे.  मूळचे अर्थ :- गोंधळलेला; पूर्ण, व्याप्त; संकीर्ण, मिसळलेले; गर्दी, जमाव; हातघाईचे युद्ध; असंबद्ध(विसंगत)वाक्य; नाश. इ. इ.  हल्ली वापरतो तो अर्थ व्याप्त आणि संकीर्ण ह्या दोन्ही अर्थाच्या भेसळीतून निघाला आहे. आणि तो मुळापेक्षा सर्वतोपरी भिन्न असला तरी आपण स्वीकारला आहे, तसेच संकेतचे व्हावे.