विषय कोणताही असो, त्यात क्लिष्टता आली की त्यातला रस निघून जातो. आज मुलांना संस्कृत भाषेचा पाया नाही. तसेच रोजच्या वापरात असलेली नावे इंग्रजी आहेत. टी. व्ही. ला कुणी चुकून तरी बोलण्यात "दुरचित्रवाणीसंच" म्हणतो का ? बाकी उदाहरणे वर दिलेली आहेच. त्यामुळे उगाच तांत्रिक शब्दांना संस्कृतप्रचुर मराठी प्रतिशब्द शोधण्यात अर्थ नाही.

मी दहावीपर्यंत मराठी माध्यमातून शिकलो. त्यानंतर अकरावीमध्ये माझ्या सोबतच्या मुलांना शेवटपर्यंत आधी मराठी शब्द मग इंग्रजी असं करत लिहावं लागलं. कारण मराठी शब्दांची अतिसवय झाली होती.

जसं आता आपण गुगलून असा शब्द वापरतो तसच मराठीत तांत्रिक शब्द का वापरू नये. ऍक्सीलरेटर हे लहान मुलांनाही कळते मग उगाच ओढून-ताणून "त्वरण" हा वापरात नसलेला शब्द का वापरावा ? यामुळे विज्ञान (आणि इतरही विषय) क्लिष्ट होतात. या शब्दांचे मराठीकरण का करू नये ?

जर रॉकेल, पेट्रोल, डिझेल, गॅस, ग्लास, रेडिओ, टीव्ही, ऑरगॅनिक, केमिकल असे कितीतरी शब्द आपल्या वापरात आहेत, त्यांना उगिच मराठीत प्रतिशब्द शोधत बसणे योग्य आहे का? आणि इतकही करून ते नवीन मराठी (की संस्कृत) वापरात येणार आहे का ?

संत ज्ञानेश्वरांनी सर्वांना गीता समजावी म्हणून प्राकृत (चुभुद्याघ्या) भाषेत आणली. ती लोकांनी डोक्यावर घेतली कारण ती रोजच्या वापरातील भाषेत होती. असाच प्रयोग इंग्रजी भाषेत झाला आहे. तो लेखक त्याचं लिखाण रोज त्याच्या मोलकरणीला वाचून दाखवत असे, जर तिला समजल तर ठीक अन्यथा तो उतारा पुन्हा लिहिल्या जायचा. लेखकाचे नाव आठवत नाही. (संदर्भ :- मातृभाषेस प्रौढी कशी येईल ? )

तसेही आपण तांत्रिक शब्द इंग्रजीतून का घ्यावे म्हणतो, पण त्यातले कित्येक शब्द मुळात फ्रेंच, जर्मन, ग्रीक किंवा लॅटीन आहेत. त्यावेळी इंग्लिश लोकांनी ते सरळसरळ स्वीकारले. मग आपण का नाही ?

जर सामान्यांच्या भाषेत विषय शिकवल्या गेले तरच ते रंजक आणि सोपे होतिल. काही दिवसांनी कंप्युटर आणि त्याचेशी संबंधीत शब्दसुद्धा मराठी शब्द वाटू लागेल यात आश्चर्य नाही.

"कालानुरुप न बदलणारी संस्कृती / भाषा कालबाह्य होते" हा नियम लक्षात घेणे आवश्यक आहे.