आत्मविश्वास म्हणजे मी आत्मा आहे हा विश्वास, कोणत्याही घटनेचा माझ्यावर काहीही परिणाम होणार नाही हा विश्वास. जसा चित्रपटातल्या कुठल्याही घटनेचा पडद्यावर काहीही परिणाम होत नाही तशी स्थिती.

नैनं छिंदंती शस्त्राणी.. याचा अर्थ देहाला काहिही झाले तरी मला काही होणार नाही हा बोध. हा बोध हे जीवन सार्थक करतो, त्यामुळे स्वास्थ्य येते आणि मग कार्य कुशलता सहज येते. कौशल्यावरचा विश्वास शरिरीक, मानसिक स्थिती किंवा प्रसंगानुरूप केंव्हाही डळमळू शकतो (तीच तर गीतेची सुरुवात आहे). पण मी आत्मा आहे हे एकदा उमगलेकी मग जीवनात संपूर्ण स्थिरता येते.

 इह आणि पर ह्या मानवी कल्पना आहेत. मी म्हणतो तो आत्मविश्वास ही जगण्याला साहस देणारी आणि मृत्युलाही नमवणारी स्थिती आहे.

कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास नव्हे. कॉन्फिडन्स ही पाश्चिमात्य कल्पना आहे. कॉन्फिडन्स हा सरावाचा भाग आहे आणि तो सारखा मनाला पटवावा लागतो. आत्मविश्वास हा बोध आहे आणि ती अपरिवर्तनिय स्थिती आहे. मुळात आपण सर्वच ती स्थिती आहोत पण आपल्याला त्याचा विसर पडला आहे आणि तेच ह्या चर्चेचे प्रयोजन आहे