चर्चा ह्या माहीतीच्या देवाण घेवाणासाठी असतात/आहेत त्या समोरासमोर झाल्या काय, फोनवरून झाल्या काय किंवा जालावरून झाल्या काय सर्व सारख्याच. माणुस बहुतेक वेळी एकाच बाजुने विचार करतो परंतु चर्चेत इतरांची मते वाचल्यावर त्या विषयावर दुसऱ्या बाजुने ही (बरेचदा) ठाम विचार आहेत याची प्रचिती येते. वानगी दाखल सांगायचे झाल्यास 'शॉर्ट टी शर्ट घालणाऱ्या युवती! ', 'आजच्या म. टा. मधील अस्वस्थ करणारे पत्र ', 'मुद्दा बरोबर पद्धत मात्र चुकीचीच असे नाही...! ' आणि अशा बऱ्याच आहेत. काही वेळा ह्या वादग्रस्त ही होतात पण त्या नेहमीच होतात असं नाही.
काहीजण स्वतः प्रतिसाद लिहीत नसले तरी वाचून अप्रत्यक्षपणे भाग घेतातच की. काहींचा नेमक्या विषयात सुक्ष्म अभ्यास असतो, संदर्भासाठी दुवे दिले जातात त्याचा फायदा सर्वानाच होतो. असे विचार काही वेळी मत परीवर्तन करायला लावणारे असतात. काहींचे प्रतिसाद नुसतेच सहमती/पुष्टी देणारे असतात जे बहुमत दर्शवून आपल्या सहमतींची बाजू बळकट करतात.
'तो व ती' कोण आहे हे माहिती असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. इथे माहीत असतात ती केवळ टोपण नावे. आणि मित्र वाढले तर बिघडलं कुठे? चर्चेतून झालाच तर तो फायदाच आहे. नाहीतरी कुठे सर्वच जण सर्वच वेळ सत्कारणी लावतात. मी तर म्हणेन टीव्हीच्या रटाळ कार्यक्रमापेक्षा चर्चा कधीही सरस. अजून एक म्हणजे सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रकारची लेखनशैली दाद देण्याजोगी असते.