सूर्य, पृथ्वी, सगळे ग्रह, तारे ज्यात फिरतात ती अथांग पोकळी सगळ्याचे मूळ-स्वरूप आहे कारण ह्या अनंत पोकळी शिवाय काहीही हलू शकणार नाही. ह्या व्यापकतेला बुद्धानी शून्य, कृष्णानी आत्मा, आणि इतरानी सत्य म्हंटलं आहे. ही निराकार व्यापकता सगळे चराचर व्यापून आहे कारण ज्या सूर्या भोवती ही पृथ्वी फिरते आहे तीच्या आत-बाहेर ही व्यापकता असल्या शिवाय पृथ्वी फिरणार कशी? ह्या पृथ्वी वरच्या प्रत्येक वस्तूच्या आत बाहेर ही व्यपकता ओघानेच आली कारण सगळेच त्या व्यापकतेत फिरत आहे. ही व्यापकता अनिर्मीत आहे त्यामुळे ती निर्मीती आणि लय या पासून अबाधित आहे. ती आनिर्मीत असल्यामुळे कालातीत आहे. ही व्यापकता अविभाज्य असल्यामुळे आपण आणि ती यात काही फरक नाही, आत्ता या क्षणी आणि (नेहेमीच) आपणही मुळात ती व्यापकता, अविभाज्यता, सत्य, किंवा आत्माच आहोत.

ही व्यापकता जाणिवेनी परिपूर्ण आहे पण जर फक्त निराकार व्यापकताच असती तर ती स्वतःला कसे जाणणार? त्यामुळे या व्यापकतेने आकार निर्माण केला पण ती  स्वतः ला आकारच समजू लागली (बघा आपण शरीर आहोत असे तुम्हाला वाटते की नाही? ) आणि आपण या शरीरात बंदिवान आहोत असे तीला वाटू लागले. मन हे ध्वनी निर्मीत असल्यामुळे व्यापकतेला आपल्या मूळ शांततेचे विस्मरण झाले, मग शब्द त्यांचे अर्थ त्यातून निर्माण होणाऱ्या भावना, नाती-गोती यानी हा कोलाहल वाढतच गेला (खरयं की नाही? ). पण निर्मीती ही या व्यापकतेची मूळ संभवना (पोटेंशियालिटी) आहे त्यामुळेच तर आपल्याला निर्मितीत आनंद वाटतो. आत्मा हे आपले मूळ स्वरूप आहे, आपण सगळेच स्वतःला व्यक्ती समजत असल्यामुळे त्या स्वरूपाचे विस्मरण झाले आहे. प्रतिसादाचा वेगळेपणा हा व्यक्तिमत्वाचा भाग आहे पण काहीही झाले तरी आपण अपरिवर्तनिय असल्यामुळे केवळ हा बोध आपल्याला मुक्त आणि निर्भय करतो