"पूर्वी महाराष्ट्रात बहुसंख्येनं दिसायचा मराठी माणूस (हा भाग संवादाचा अर्थ आहे. मूळ वाक्य नाही, यापुढचा मात्र मूळ चित्रपटातील संवाद आहे.), आणि आता? वेडात मराठे वीर दौडले सात? फक्त सात? बाकीचे कुठे गेले?"
असा एक निरर्थक संवाद चक्क शिवाजीमहाराजांच्या तोंडी घालण्याचा मूर्खपणा करणाराही लेखक याच चित्रपटाला लाभला आहे. संवाद, प्रश्नाची स्पष्ट मांडणी, उपाय सुचवण्याचा प्रयत्न, चित्रपट म्हणून मांडणी याबाबत निराशाच पदरी पडणारसं वाटतंय झलक बघून.
त्यामुळे माझा तरी चित्रपटाविषयी असा पूर्वग्रह झालाय की तापल्या तव्यावर पोळी भाजून घेण्याची इच्छा असलेल्या पैसालोलुप निर्मात्याने हे केलंय.
राजने उभं केलेलं आंदोलन आणि निवडणुकीच्या निमित्ताने मराठीचं भांडवल सगळेच करणार असल्यानं तवा तापलेला आहेच, तेव्हा अशा विषयावरचा चित्रपट नक्की चालेल, घ्या पोळी भाजून! हे एक व्यावसायिक गणित आहे. ते मांडायला आणि त्याचा फायदा घ्यायला माझा विरोध नाही. प्रत्येकाला स्वतःची व्यावसायिक भरभराट करून घेण्याचा, प्रसिद्धी मिळवण्याचा पूर्ण हक्क आहे.
पण हे करताना तद्दन भिकार चित्रपट बनवून लोकांच्या भावनांची दिशाभूल होणार नाही याची काळजी घ्यावी हा विचार या चित्रपटनिर्मात्याने, दिग्दर्शकाने केलेला असेल असं त्या चित्रपटाच्या ज्या झलका सध्या दाखवताहेत त्यांवरून तरी वाटत नाही. समाजास जिव्हाळ्याचा वाटेल अशा विषयाचा मुखवटा घेऊन नेहमीचाच मूर्खपणा याही चित्रपटातून दिसेल अशी माझी अटकळ आहे.
देव करो नि या चित्रपटाच्या जाहिरात करणाऱ्या कंपनीच्या लोकांनाच फक्त अक्कल नसो आणि त्यांनी चांगल्या विषयावरील चांगल्या चित्रपटाचे वाईट प्रोमोज बनवण्यात यश मिळवलेलं असो, आणि माझी अटकळ खोटी ठरो.....