अध्यात्म हे जीवन मजेत जगण्याचे शास्त्र आहे. आत्मा जाणणारा घटनेच्या परिणामा पासून अबाधित असल्यामुळे इतका निश्चींत असतो की तो प्रत्येक प्रसंगात विविधता आणतो, वेगवेगळे पर्याय त्याला अनायसे उपलब्ध होतात, कार्यकुशलता (कॉंफिडन्स) ही त्या निश्चींततेच दडलेली असल्यामुळे त्याला त्यासाठी वेगळा कुठलाही प्रयत्न करावा लागत नाही. कृष्णाच्या शब्दात 'तो जागेपणी निद्रेचे सुख अनुभवतो (यस्याम जागर्ती भुतानां सा निशा पस्च्यते मुनेः २/६९)
आत्मवान हा जीवना बद्दल इतका कृतज्ञ असतो की प्रत्येक क्षण त्याला कुतुहलाचा वाटतो त्यामुळे नाविन्याचे त्याला नेहेमी कौतुक असते, जीवन आनंदी करणारी कोणतीही कला शिकायला तो नेहेमी उत्सुक असतो. त्याचा प्रत्येक दिवस नवा असतो.
आपले अध्यात्म हे वैराग्य किंवा निराशेवर आधरलेले नाही. मी माझा अनुभव तुम्हाला सांगतो आहे, तुम्हीही त्यात सामिल व्हा.
तुम्ही नीट विचार कराः संगीत आत्मसात करायचे असेल तर सघन शांततेची साधना करावी लागेल कारण ती स्वरांचा पडदा आहे, नृत्यात प्राविण्य हवे असेल तर आपण शरीरापेक्षा वेगळे आहोत हे जाणावे लागेल कारण नृत्य हा जाणिवेच्या अवकाशातला विहार आहे, चित्र सघन व्हायचे असेल तर आकार आणि रंग ज्या व्यापकतेत निर्माण झालेत ती व्यापकता जाणवायला हवी. त्यामुळे आत्मा हा सर्व नैपुण्य आणि सृजनाची मुलभूत आवश्यकता आहे. अमरत्व तुम्हाला प्राप्त करायचे नाही तुम्ही स्वतःच अमृत आहात आणि सृजन, कुतुहल, कौशल्य ही आत्मजाणिवेतच अन्युस्युत आहेत