विटेकरसाहेब,
उत्तर सापडले का?
गुगलने हे उत्तर दिले-
http://www.loksatta.com/daily/20020714/lmvachak.htm
‘नाथा घरची उलटी खूण‘ हा अभंग श्रीधर स्वामींचा आहे. नाथ हे थोर संत, विभूती होते. पण भक्त होते हे महत्त्वाचे. भक्त कसा जाणावा त्याच्या खुणा ज्ञानेश्वरी, दासबोध, एकनाथी भागवत अशा अनेक ग्रंथांत देतात. भक्ताला भगवंत-भेटीची तळमळ असते. तो जप, तप, साधना करतो. भगवंतप्राप्तीसाठी भक्त तडफडत असतो. पाण्यावाचून मासा राहू शकत नाही, तसा भक्त भगवंताशिवाय जगू शकत नाही. ही भक्ताची खूण झाली.
‘पण नाथा घरची उलटी खूण
पाण्याला लागली मोठी तहान।‘
ज्या पाण्याने तहान भागते, त्या पाण्याला तहान लागली, ही उलटी खूण! भगवंताला भक्त-भेटीची तहान लागली आहे. श्रीखंड्याच्या वेशात भगवंत जगजेठी भक्ताघरी कावडीने पाणी भरतो, त्या भक्ताचा हरकाम्या होतो. श्रीधर स्वामी म्हणतात-
‘ऐक बाई मी नवल देखिले
वळचणीचे पाणी आठ्याला गेले।‘
पाण्याचा वरून खाली येणे हा धर्म आहे. पण पाणी आपला धर्म विसरले. ते खालून वर गेले. गंगा उलटी वाहू लागली. एकनाथ विभक्त नव्हतेच. भगवत्-स्वरूपात मिसळून गेले होते. पाण्याने भरलेली घागर विहिरीत बुडवली, तर आतले पाणी व बाहेरचे पाणी एक होते. तसे जीवात्मा-परमात्मा एक झाला होता. श्रीधर स्वामी म्हणतात
‘आतमध्ये घागर बाहेर पाणी
पाण्यासी पाणी आले बांधूनी।‘
कर्नाटकातील सावकाराने विठ्ठला-ची सुंदर मूर्ती पूजेकरिता तयारकेली. पण प्राणप्रतिष्ठा करण्यापूर्वी मूर्ती सलग तीन दिवस स्वप्नात येऊन सावकाराला पैठणला नाथाकडे नेण्यास सांगत होती. सावकार ती मूर्ती घेऊन पैठणला आला. तिला पाहून नाथ म्हणाले, ‘माझ्याकडे काय मिळणार? सावकाराकडे नाना भोग मिळाले असते. ‘ ‘दास मला जेवू घाल‘, असे विटेवर शब्द आले. ते पाहून नाथ सद्गदित झाले. नाथांनी लोण्याचा गोळा हातात घेऊन देऊ केला. तेव्हा मूर्तीने कटीवरचा हात काढून लोण्या-साठी नाथांपुढे हात केला. ती मूर्ती अजूनही पैठणला आहे. खरंच, हा भगवंत भक्तासाठी किती वेडा झाला.
श्रीधर स्वामी म्हणतात-
‘मडके खाऊन भात टाकिला
बकऱ्यापुढे देव कापिला।‘
भक्तापुढे देव कःपदार्थ झाला.
‘श्रीधर स्वामी म्हणे मार्ग उलटा
जाणेल तोची गुरूचा बेटा।‘
हा भक्तीचा मार्ग उलटा कसा आहे, हे जाणायचे आहे. हे इंद्रियांना काही समजणार नाही. ही इंद्रियांच्या पलीकडील गुरूभक्तीची खूण आहे. हा खरा गुरूभक्तच जाणतो.
- सुलभा जोशी, डोंबिवली (प). दूरध्वनी-४८३७२३/ ४९३७९२.
यांच्याकडून साभार.
खाप्रे यांच्या संकेतस्थळावर हाच अभंग नाथांचेच भारूड म्हणून दिला आहे.???