उत्स्फुर्तता हा काव्याचा महत्त्वाचा गुण आहे असे मी मानतो. आपल्या या टीकात्मक वाटणाऱ्या रचनेत तो जागोजागी जाणवतो.
जसे, मी शब्द कुणा दुसऱ्याचे चघळत नाही, मज भूक तशीही कधी लागली नाही. वरवर पाहता हे एक सरळ विधान आहे. यात प्रतिमाही शोधता येतील. पण प्रतिमांपेक्षा मला ती ओळ एका मनस्थितीतून आलेली जाणवते.
तुमची का अजुनी तुम्ही दावली नाही? हा एक असाच शेर! पांडित्यपूर्ण विधाने करून स्वतः साठी स्थान निर्माण करू पाहणारे मैदानात उतरत नाहीत कारण पितळ उघडे पडण्याची शक्यता असते. मतप्रदर्शन व निर्मीती हे दोन भिन्न प्रकार असल्याने मतप्रदर्शनावर भर देऊन स्थान मिळवायचे व ते स्थान लाभल्यावर मग धुमकेतूच्या वारंवारतेने निर्मीती करून ते स्थान बळकट करायचे! अश्यांना आपला हा शेर झोंबणारा आहे.
तसेच:
ती भल्या पहाटे कधी भेटली नाही
पण रात्र कधीही तिने टाळली नाही
'ती भेटे मज' हे पाहून काही रडले
उरलेल्यांना 'ती' तार पोचली नाही
( दुसऱ्या शेरातील पाहूनमधील 'हू' हा इथे शुद्धलेखनाची सोय असल्यामुळे प्रयत्नपुर्वक पुन्हा 'ऱ्हस्व' करून लिहावा लागतो असा माझा अनुभव .)
तो शब्दांमागे धावून संपून गेला
पण तिथे जराही गझल थांबली नाही
ते जोडत बसले लघू-गुरूंच्या माळा
पण गाठ कुणी 'अर्थास' बांधली नाही
हे शेरही साहित्यक्षेत्रातील सर्वज्ञात दुर्दैवी 'उष्ट्राणाम तु विवाहेषु' प्रवृत्तीला व 'भासणे अन असणे' यातील फरकाला ठळकपणे उद्धृत करतात.
एक आक्रमक रचना!
आपले अभिनंदन!
मात्र, माझ्यामते ( व माझ्याही अनुभवाप्रमाणे ) सार्वकालीन रचनांमध्ये अशा रचना समाविष्ट होणे जरा अवघड असते.
आपल्या पुढील गझलेच्या प्रतीक्षेत!