श्री चैतन्यसाहेब व श्री अजय,

प्रतिसादासाठी आभारी आहे.

श्री जयंतासाहेब व श्री मानससाहेब,

आपल्याला रचना स्पष्ट वाटली नाही हे माझे अपयश आहे. दिलगिरी! मी खाली अर्थ देण्याचा प्रयत्न करत आहे. कृपया असेच प्रतिसाद देत रहा, ज्यामुळे माझ्यात सुधारणा करण्याची इच्छा व बळ राहील. मनापासून धन्यवाद!

वसुंधरे नुरे तुझ्यात कल्पनाच वेगळी
रचायला हवी अता वसुंधराच वेगळी

शब्दार्थ - हे पृथ्वी, तुझ्यातील सर्व गोष्टींवर काव्य करून झाले. आता मी रचावे असे तुझ्यात काही उरलेच नाही. आता मला वाटते की मी एक नवीन पृथ्वीच रचलेली बरी.

अर्थ - आयुष्यातील रस संपलेला आहे. आता एका नवीन आयुष्याची वाट पाहत आहे.

उगाच सांगतेस कारणे न आवडायची
मलाच मी न आवडे तुझी कथाच वेगळी

शब्दार्थ - हे प्रिये, तू उगीचच मला सांगत बसतेस की मी तुला का आवडत नाही ते! मुळात मलाच मी आवडत नाही तिथे तुला आवडणे न आवडणे याचा प्रश्नच कुठे येतो ?

अर्थ - हे नशीबा, तू माझ्याबाजूने का नाहीस याची स्पष्टीकरणे कशाला देत आहेस? मी कुठे कधी नीट वागलो म्हणून मी तुझ्याकडून काही अपेक्षा कराव्यात?

उगाच मोहवायचा प्रयत्न चालतो तुझा
न मीच आवडे मला तुझी कथाच वेगळी

शब्दार्थ - हे प्रिये, तू उगीचच विविध प्रकारे मला आकर्षित करण्याचा प्रयत्न करत बसतेस. जिथे मीच मला आवडत नाही तिथे तू मला काय आवडणार?

अर्थ - हे भगवंता, तू कधी कधी चांगल्या गोष्टी माझ्या नशिबात लिहून मला तूझ्या भक्तीत राहण्यासाठी आकर्षित करतोस खरा, पण मला मीच इतका अप्रिय आहे की माझ्याबाबतीत काही चांगले झालेले मुळात मलाच आवडत नाही तिथे ते चांगले करणारा मला कसा आवडेल?

नवीन वाट घेतली तरी तिथेच पोचतो
वळून पाहतो असा जणू दिशाच वेगळी

शब्दार्थ - नवीन आत्मविश्वास गोळा करून मी एखादी नवीन वाट अशा पद्धतीने धरतो जसे काही मी एखादी नवीन दिशाच शोधली आहे.

अर्थ - मुळात मी जसा आहे तसाच असल्यामुळे मी कुठेही गेलो तरी मला तेच अनुभव येणार! हा नुसता भासच की मी काहीतरी वेगळे केले वगैरे!

करार मोडतोस, तेच देत राहतोस तू
जुनेच श्वास वाटतोस घेत लाच वेगळी

शब्दार्थ - हे आयुष्या, फक्त मला टिकवणारे काही श्वास, याव्यतिरिक्त खरे तर तू काहीही वेगळे देत नाहीस. मात्र, तेच देताना माझ्याकडून मात्र विविध प्रकारच्या कसरती करून घेतोस.

अर्थ - जे जे काही मी करत आलो त्याने झाले काय? झाले इतकेच की मी फक्त जिवंत आहे. जराशी परिस्थिती भिन्न असेल इतकेच, पण माझे जगणे शेवटी फक्त एक जीव टिकणे याशिवाय काहीही नाही. कितीही विविध प्रयत्न करून पाहिले तरीही!

मनास लागल्या कळा प्रसूतकाळच्या पुन्हा
निघायची असेल एक भावनाच वेगळी

शब्दार्थ - मनास पुन्हा प्रसुतीवेदना जाणवत आहेत. कदाचित एक नवीन भावना जन्माला येणार असेल.

अर्थ - भीती, नैराश्य, हेवा, क्रोध, आशा, आत्मविश्वास, तिरस्कार, आनंद, लालसा यासारख्या अनेक भावनांची निर्मीती या मनात झाली. आता पुन्हा ते थरथरत आहे म्हणजे बहुतेक काहीतरी नवीन अनुभव आलेला असणार अन आजतागायत जी भावना अनुभवली नाही ती आता निर्माण होणार!

तुझेच बिंब शेवटी दिसेल या मनामध्ये
टिकेल, जाहली जरी फुटून काच वेगळी

शब्दार्थ - माझ्या मनाची काच फुटून तिचे अनेक तुकडे झाले तरी त्यातील प्रत्येक तुकड्यात तुझेच प्रतिबिंब दिसणार हे नक्की!

अर्थ - हा शेर प्रेयसी वा स्वगत या अर्थाने मानायला जायला हरकत नाही. मी तिच्याशिवाय किंवा माझ्या स्वतः शिवाय दुसरा कसलाही विचार करत नसल्याने तिने किंवा मीच माझे मन मोडले तरी पुन्हा त्या मनाच्या तुकड्यांमध्येही ती किंवा मीच दिसणार!

बराच काळ जाहला 'असे' म्हणून मी तुला
हसून घे मिठीत, वाग एकदाच वेगळी

शब्दार्थ - हे प्रिये, (अनेक वर्षांपुर्वी) मी तुझ्याकडे आग्रह धरून बसायचो की (माझ्या प्रेमाची खरी किंमत ओळखून) मला जवळ कर अन नेहमीसारखा तिरस्कार किंवा दुर्लक्ष न करता प्रेम कर!

अर्थ - आजकाल मला असे म्हणावेसे सुद्धा वाटत नाही की हे आयुष्या, मला जवळ कर अन माझ्यावर प्रेम कर! कारण आलेल्या अनुभवांमुळे मला दुःखाचीच इतकी सवय झाली आहे की सुखाची प्रतीक्षा किंवा मागणी करण्याची सवयच संपली आहे.

घशात जात लोचनात येत मद्य बोलले
तुझी नशाच वेगळी, तुझी अदाच वेगळी

शब्दार्थ - मी प्राशलेली दारू माझ्या घशातून आत जाऊन अश्रूरुपाने डोळ्यातून बाहेर येऊन मला म्हणाली की तुझी नशा अन तुझी शैली किंवा विभ्रम वेगळेच आहेत. ( मद्यालाच माझी नशा व्हावी असा मी आहे. )

अर्थ - इतके जगून झाल्यावर मी आता माणूस उरलो नसून फक्त एका 'प्रवृत्तीचा अतिरेक' झालेलो आहे. असा अतिरेक की त्या प्रवृत्तीची माणसे मला तसा अनुभव द्यायला आल्यावर हारतात अन माझ्याकडूनच तसा अनुभव घेऊन जातात. ( ही प्रवृत्ती म्हणजे क्रोध, मत्सर, तिरस्कार, प्रेम यातील काहीही असू शकेल. जे मला अभिप्रेत होते ते होते 'निराशेतून आलेले रूदन')

यापुर्वी मी असा माझ्या रचनेचा अर्थ कधी लिहिलेला नाही. आशा आहे की आपल्याला हा अर्थ ठीक वाटावा.

प्रतिसादासाठी धन्यवाद! आपल्याही रचनांच्या प्रतीक्षेत!