हा चित्रपट हा एक कल्पनाविष्कार आहे हे निश्चित समजण्याइतके स्पष्ट आहे. या रूपात म्हणजे आधुनिक काळातल्या रूपात / महेश मांजरेकरच्या रूपात महाराजांना बघणे शक्य आहे. महेशच्या वैयक्तिक व्यसनाकडे इथे लक्ष वेधण्याचा माझा प्रयत्न नाही. मराठीच्या प्रश्नावर चित्रपट निर्माण होतो आहे, हे या प्रश्नाचं गांभीर्य चित्रपटसृष्टीने(ही) ओळखल्याचं लक्षण आहेच. किंवा मराठी माणूस महेश मांजरेकर इतर मराठी कलाकारांना संधी देत आहे हीही गोष्ट चांगलीच आहे. यातला कोणताही मुद्दा हा विरोध करण्यासारखा नाही. खरंतर या चांगल्या गोष्टी आहेत.

जिव्हाळ्याचे प्रश्न मांडायचे, तर त्या प्रश्नाचं गांभीर्य, ज्या माध्यमातून ते मांडायचे त्या माध्यमाच्या ताकदीची जाणीव ही चांगल्या दिग्दर्शकाला असली पाहिजे आणि त्या जाणिवेचा, ताकदीचा वापर त्याने चांगल्या प्रकारे करून घेतला पाहिजे. अभिप्रेत असलेला संदेश पोचण्याची जबाबदारी त्याने स्वीकारली पाहिजे, पेलली पाहिजे. अस्तित्व, वास्तव, निदान यासारख्या चित्रपटांतून ही जाणीव महेशने दाखवलेली आहे.

"वेडात मराठे.. " या संवादाचं उदाहरण देऊन, मला म्हणायचं इतकंच होतं की मी शिवाजेराजे.. ची मात्र एकही झलक बघून त्याची ही जाणीव व्यक्त होईल असं काहीही पदरात पडलेलं नाही. "गर्व आहे मला, मी महाराष्ट्रीय असल्याचा" यासारखे संवाद हे तर मराठी शब्दांत बोललेले हिंदी संवाद वाटतात. मराठीत गर्व हा "ग ची बाधा" या अर्थाने वापरला जातो, अभिमान, स्वाभिमान सारखे जास्त मराठी शब्द यांना सुचले नाहीत? आपण व्यक्त करतोय तो आशय निदान अशा चित्रपटाने त्या भाषेचा लहेजा सांभाळून दाखवायला नको? असो. आधी पण म्हटलं होतं तसं एका चांगल्या विषयावर दिशाभूल करणारा भिकार चित्रपट असेल असं या झलका बघून वाटतंय. तसं नसेल तर हवंच आहे.