विसुनानांशी झालेल्या चर्चेत खालील अभंग मिळाला. तुकारामांनी स्वतःचे चरित्र खालीलप्रमाणे लिहिले आहे.
याति शूद्र वैश केला वेवसाव । आदि तो हा देव कुळपूज्य ॥१॥
नये बोलों परि पाळिलें वचन । केलियाचा प्रश्न तुम्हीं संतीं ॥२॥
संवसारें जालों अतिदुःखें दुखी । मायबाप सेखीं कर्मलिया ॥३॥
दुष्काळें आटिलें द्रव्यें नेला मान । स्त्री एकी अन्न अन्न करितां मेली॥४॥
लज्जा वाटे जीवा त्रासलों या दुःखें । वेवसाय देख तुटी येतां ॥५॥
देवाचें देऊळ होतें तें भंगलें । चित्तासी जें आलें करावेंसें ॥६॥
आरंभीं कीर्तन करीं एकादशी । नव्हतें अभ्यासीं चित्त आधीं ॥७॥
कांहीं पाठ केलीं संतांचीं उत्तरें। विश्वासें आदरें करोनियां ॥८॥
गाती पुढें त्यांचें धरावें धृपद । भावें चित्त शुध्द करोनियां ॥9॥
संताचें सेविलें तीर्थ पायवणी । लाज नाहीं मनीं येऊं दिली ॥१0॥
टाकला तो कांहीं केला उपकार । केलें हें शरीर कष्टवूनि ॥११॥
वचन मानिलें नाहीं सहुर्दाचें । समूळ प्रपंचें वीट आला ॥१२॥
सत्यअसत्यासी मन केलें ग्वाही । मानियेलें नाहीं बहुमतां ॥१३॥
मानियेला स्वप्नीं गुरूचा उपदेश । धरिला विश्वास दृढ नामीं ॥१४॥
यावरि या जाली कवित्वाची स्फूर्ति । पाय धरिले चित्तीं विठोबाचे ॥१५॥
निषेधाचा कांहीं पडिला आघात । तेणें मध्यें चित्त दुखविलें ॥१६॥
बुडविल्या वहया बैसलों धरणें । केलें नारायणें समाधान ॥१७॥
विस्तारीं सांगतां बहुत प्रकार । होईल उशीर आतां पुरे ॥१८॥
आतां आहे तैसा दिसतो विचार । पुढील प्रकार देव जाणे ॥१९॥
भक्ता नारायण नुपेक्षी सर्वथा । कृपावंत ऐसा कळों आलें ॥२०॥
तुका म्हणे माझें सर्व भांडवल । बोलविले पांडुरंगें ॥२१॥
तुकारामांचे संतपदाला पोचणे हे (यादव यांच्या मते) पूर्वायुष्यातील तथाकथित वाईट मार्गाला लागण्याच्या पश्चात्तापामुळे नव्हते. व्यसनी मित्रमंडळींच्या सोबत टवाळक्या करणे, मुलींना गोळ्या देण्याचा बहाणा करुन चोरटे स्पर्श करणे वगैरे घाणेरडे प्रकार तुकारामांनी केले असे यादव यांनी सांगणे हे चिखलफेक नाही का? तुकारामांचे आपल्या समाजातील, लोकांच्या मनातील काय स्थान आहे याचा विचार न करता कादंबरीत सनसनाटी प्रसंग व वातावरण निर्माण करण्यासाठी यादव यांनी केलेल्या प्रकाराला चिखलफेक नाही तर काय मानता येईल? इथे तुकारामांच्या जीवनातील न घडलेले चुकीचे प्रसंग रंगवण्याची काय गरज आहे हे समजले नाही.
जर तुकारामांच्या जीवनातील या प्रसंगांबाबत यादव यांना खात्री होती तर मग कादंबरीतील ती पाने वगळण्याचा निर्णय का घेतला? याचेही त्यांनी स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे.