सार्वजनिक सभा / स्नेहसंमेलने / गाण्याच्या बैठकी / नाटके / सिनेमे / आगगाडीतला अनारक्षित डबा वगैरे अशा ठिकाणी जेव्हा जेव्हा म्हणून प्रत्येक माणसाची बसण्याची जागा अगोदर नेमून दिलेली नसते, तेव्हा तेव्हा जागा अडवून जागेवरचा आपला दावा राखून ठेवण्यासाठी त्या जागेवर रुमाल टाकण्याचा तोडगा मला वाटते सर्वमान्य असावा.

सहसा एखाद्या गटातल्या सगळ्यांच्या अगोदर उगवणाऱ्या मेंबराकडे अशी सगळ्यांची जागा अडवण्याची कामगिरी येते. आणि ज्यांच्यासाठी जागा अडवली अशा सर्व मेंबरांनी जागेचा ताबा घेतल्यानंतरसुद्धा, काही कारणामुळे जर एखाद्या किंवा अनेक मेंबरांना मध्येच उठून जागा तात्पुरती सोडून जावे लागले (जसे मध्यंतरात किंवा कर्जतच्या स्टेशनावर बटाटेवडे आणण्यासाठी), तर अशा मेंबरांचा जागेवरचा दावा कायम ठेवण्यासाठीसुद्धा त्या जागांवर रुमाल टाकला जातो.

पूर्वीच्या काळी आगगाडीचे रिझर्वेशन नसल्यास हमालास पाच रुपये (अधिक) दिले असता तो इमानेइतबारे अनरिझव्ड (या शब्दाचा उच्चार असाच करावा. ) डब्यात अगोदरच रुमाल टाकून अडवून ठेवलेली शीट आपल्या वापरासाठी मोकळी करून देत असे. ही महान संस्कृती अजूनही अस्तित्वात आहे की नाही याची कल्पना नाही.