संतोष, वीज हा ऊर्जास्रोत आहे हे म्हणणे बरोबर. या ऊर्जास्रोताचा वापर करून जी उपकरणे चालवली जातात त्यांच्यातून वातावरणाचे तापमान वाढविणारे वायू आणि प्रत्यक्ष उष्णता यांची निर्मिती होते. विजेचा वापर मर्यादित करून अशी उपकरणे काटकसरीने वापरली तर त्याचा फायदा ग्लोबल वॉर्मिंगची तीव्रता अंशतः कमी करण्यासाठी अवश्य होऊ शकतो. ही ऊर्जाबचतीची आणि पर्यावरणरक्षणाची जाणीव करून देण्यासाठी, वाढीस लागण्यासाठी अर्थ अवर सारखे उपक्रम उपयोगी ठरतात.

तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय? ग्लोबल वॉर्मिंग हे खूळ आहे का अर्थ अवर हे? अर्थ अवरबाबत म्हणत असाल तर ते तुमचं वैयक्तिक मत म्हणून सोडून देता येईल. पण ग्लोबल वॉर्मिंग हे खूळ आहे असं तुमचं प्रामाणिक मत असेल तर मात्र वाचाच खुंटली. हे सत्य स्पष्ट करून पटवून देण्याची क्षमताच माझ्यात तरी नाही.

समस्या मात्र अशी आहे की अर्थ अवरसारखे उपक्रम हे खूपच मर्यादित प्रमाणात पाळले जातात, स्वेच्छेने त्यात सहभागी होणारे हे सहभागी न होणाऱ्यांच्या मानाने कमी असतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशा उपक्रमांचं स्वरूप प्रासंगिकच राहतं. लोकांच्या राहणीमानावर त्याचा कायमचा परिणाम होताना दिसत नाही. त्यापेक्षा सक्तीच्या भारनियमनाचा उपयोग या दृष्टीने अधिक आहे. (मी वीज महामंडळात कामाला नाही. माझ्या घरीही भारनियमन होतं आणि त्याचा वैतागही होतो. त्यामुळे भारनियमनाचं समर्थन मी करतेय असं कृपया समजू नका कोणीही. पण...) विजेच्या वापरावर सक्तीने आणि सातत्याने अंकुश राहत असल्याने त्याचा पर्यावरणाच्या दृष्टीने अनुकूल परिणामही होतोच.

भारनियमन आणि भारतातील मूलभूत सुविधांचा अभाव याविषयी हॅम्लेट यांच्याशी सहमत आहे.

संपूर्ण जगातून किमान आठवड्यातून / पंधरवड्यातून एकदा अर्थ अवर पाळला गेला (बहुधा सक्तीनेच!) तर ग्लोबल वॉर्मिंगची तीव्रता खऱ्या अर्थाने कमी होऊ शकेल. अशा उपक्रमांमध्ये मूळ कल्पनेइतकंच सातत्याला महत्त्व आलं आणि ते सातत्य प्रत्यक्षात उतरलं तर ते यशस्वी होऊ शकतात. अन्यथा एक चमकदार चांगली कल्पना इतकंच त्यांचं अस्तित्व राहतं.

तेव्हा असे उपक्रम हे सातत्याने राबवले पाहिजेत याकडे आपण अधिक लक्ष द्यायला हवं.