संस्कृतमध्ये लेखक किंवा लिपीकार म्हणजे साधारणपणे कारकून, मजकुराच्या नकला करणारा. आणि कवी म्हणजे ज्ञानी, विचारी, काव्यकर्ता वगैरे. गद्यम्‌ म्हणजे कवीने रचलेली छंदविरहित शब्दयोजना. या गद्यरचनांना गद्यकाव्येच म्हणत. निव्वळ गद्यरचना करणारे, दण्डी(दशकुमारचरितम्‌‌, अवन्तिसुन्दरी कथा), बाणभट्ट(कादम्बरी, हर्षचरितम्‌) असले लेखक विरळाच. गद्ये समजली जाणारी चम्पूकाव्ये आणि हितोपदेश, वेतालपञ्चविंशति: किंवा पञ्चतंत्र आदी कथासंग्रहांत निम्याशिम्या ओळी म्हणजे पद्यरचनाच आहेत.