मी जन्मल्यापासून पुण्यात राहतो.  मी शास्त्री रोड हे नाव ऐकलेले असले तरी तो कुठे आहे ते मला माहीत नाही, बँ नाथ पै चौक तर मी ऐकलेलाही नाही. हे शास्त्रीबुवा कोण हे तर वरील प्रतिसाद देणाऱ्यांनाही माहीत असेल की नाही याबद्दल शंका आहे. दांडेकर पूल माहीत आहे आणि तोच खरा पत्ता आहे. पुण्यात टिळक रोड, जंगलीमहाराज रोड, कर्वे-आपटे आणि सेनापती बापट रोड असली दोनचार नावे सोडली तर बाकी कुठल्याही रस्ता व्यक्तिनामाने ओळखला जातो असे मला वाटत नाही. ज्या लोकांनी पुण्यासाठी किंवा महाराष्ट्रासाठी काही चांगली कामे केली अशांनाच पुणेकर ओळखतात. कॅम्पमधील महात्मा गांधी हा रोड मेन स्ट्रीट याच नावाने प्रसिद्ध आहे..  

पुण्यात पाच-सहा आंबेडकर रोड आहेत. मुंबईत एकट्या पश्चिम कांदिवलीत तीन आहेत. शहराच्या इतर भागात आणखीही असणार. महात्मा गांधी रोड पाच तरी असतील. त्यामुळे व्यक्तीच्या नावावरून दिलेल्या नावांमुळे गोंधळ होत असल्याने असली नावे कुणाच्या खिजगणतीतही नसतात. त्यातूनही रस्त्याचे किंवा गावाचे/स्टेशनचे नाव पाच अक्षराहून मोठे असले की लोक त्याचे लघुरूप करतात. अशा लघुरूपावरून मूळचे नाव काय असेल याचा अंदाजही करता येत नाही. अहमदनगरमधील लोटिरोड म्हणजे लोकमान्य टिळक रोड हे कळायला मला पंचवीस वर्षे लागली.  बोरीबंदरला छशिट, कोळीवाड्याला जीटीबी‌एन, व लोकमान्य टिळक टर्मिनसला लोक कुर्ला टर्मिनस म्हणतात.

 रांगेने तीन अंकी क्रमांक असलेल्या घरांदरम्यानच्या एखाद्या घराचा नंबर चार आंकडी असतो. त्या घराची मागील बाजू ज्या रस्त्यावर असते तिथला चार अंकी नंबर त्याला मिळालेला असतो.  अजूनही पुण्याचा परिपूर्ण रोडमॅप बाजारात उपलब्ध नाही.  त्यामुळे संगणकावरून तसा मिळवणे अशक्य आहे.