कुठल्याही रस्त्याला, चौकाला किंवा संस्थेला नाव देण्याआधी खालील गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत.  तो रस्ता त्या माणसाच्या स्मरणार्थ बांधला आहे का?  तो रस्ता व्हावा म्हणून त्याने काही श्रम-प्रयत्‍न केले आहेत का?  त्या रस्त्यावर त्या व्यक्तीने स्थापन केलेली एखादी समाजोपयोगी संस्था आहे का? त्या रस्त्यासाठी त्याने काही देणगी दिली आहे का? असे नसेल तर त्या रस्त्याला लोक कधीही त्याच्या नावाने ओळखणार नाहीत, अगदी कितीही वेळा त्या रस्त्याने गेले तरी! लालबहादुर शास्त्री, किंवा नाथ पै यांचा त्या रस्त्याशी काहीही संबंध नाही अशी माझी कल्पना आहे.

अलका टॉकीजवरून पर्वतीकडे जाणार्‍या रस्त्याला नवी पेठ म्हणतात आणि तेच त्या रस्त्याचे लोकप्रिय नाव आहे. प्रभात स्टुडिओ असलेला प्रभात रोड, टिळक स्मारक मंदिराकडे जाणारा टिळक रोड, केसरीच्या  संपादकांच्या नावाचा केसरीवाड्याकडे जाणारा न.चिं.केळकर रस्ता, हिंगण्याच्या कर्वे विद्यापीठाकडे जाणारा व धोंडो केशव कर्वे यांचा पुतळा ज्यावर आहे असा कर्वेरोड, भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंदिर असलेला भांडारकर रोड, गणेशखिंडीतून जाणारा गणेशखिंड रस्ता, शनवारवाड्याकडून पर्वतीला जाणारा (पहिला)बाजीराव रोड ही नावे नैसर्गिक आहेत, त्यामुळे ती लोकांच्या सहज लक्षात राहतात आणि वापरली जातात.  ज्याचा रस्त्या-चौका-संस्थेशी काडीमात्र संबंध नाही अशा माणसाच्या नावाला लोक वाळीत टाकतात.

मुंबईत अशी अनेक नैसर्गिक नावे आहेत. लॅबर्नम रोड, जमशेटजी जीजीभाई रोड, कुलाबा रस्ता, नानाभाई मूस मार्ग, हँगिंग गार्डन रस्ता, वाळकेश्वर रस्ता, नाना चौक, जावजी दादाजी स्ट्रीट, काळबादेवी/मुंबादेवी रोड, महंअद‌अली रोड, आग्रा रोड, जुना आग्रा रस्ता ही सर्व नैसर्गिक नावे आहेत. रे रोड, क्रॉफर्ड मार्केट, सायन सर्कल, चर्नी रोड, पोर्तुगीज चर्च यांना कुणीतरी आणि कधीतरी अनुक्रमे बॅरिस्टर नाथ पै मार्ग, फुले मंडई, महाराणी लक्ष्मीबाई चौक, राजा राम मोहन रॉय स्टेशन, प्रबोधनकार कै.केशव सीताराम ठाकरे चर्च असे म्हणेल?