पिल्लांस मांजराच्या छावा म्हणू नका रे,
हे बोल कळकळीचे, कावा म्हणू नका रे
पहिल्या ओळीचा समारोप दुसऱ्या ओळीत झाला आहे. यातील 'कळकळीचे' हा शब्द सर्वात महत्त्वाचा! त्यातून मांजराच्या पिल्लाला किंवा पिल्लांना छावा म्हंटले जात आहे याचा रास्त क्रोध आहे. तसेच आपल्या या वक्तव्याला 'कावा' म्हंटले जाण्याची शक्यता आहे असाही एक ( येथे रास्त म्हणणार नाही ) संशय आहे. समजा कुणी एखाद्या मांजराच्या पिल्लाला 'छावा... छावा' म्हणून आनंदाने टाळ्या पिटत नाचले तरी कवीला काय प्रॉब्लेम येत असावा याची जाणीव मात्र या शेरातून होत नाही. कवी स्वतः छावा असल्यास त्याला याचा राग येणे शक्य व्हावे. समीक्षेमध्ये कवितेच्या निर्मीतीमागची भूमिका समजावून घेण्याचा प्रयत्न होणे हे अत्यावश्यक असते. या शेराची निर्मीती ही एका अत्यंत निराशाजनक मनस्थितीतून झालेली आहे. ज्यात माणूस फक्त टीकाच करू शकतो. या शेराचे अनेक अर्थ आहेत.
१. राजकारणी नालायक आहेत.
२. ऐतिहासिक व्यक्तींचे दाखले देऊन आज फायदे काढू पाहणारे मुळात त्यांच्यासारखे नाहीत.
३. कुणी स्वतःची टिमकी वाजवत आहे खरा, पण त्याच्यात तसा काहीच अर्थ नाही.
४. खरे कोण आहे ते ओळखायला शिका 'रे', कुणालाही डोक्यावर घेऊन नाचू नका, वगैरे वगैरे!
या 'गझलेतील' जो 'रे' आहे ते वृत्तात बसणारे एक 'स्वतःच्या जीवावर चालू शकणारे व अर्थाशी बऱ्यापैकी सबंधित वाटू शकणारे' अक्षर या भूमिकेतून आला आहे. म्हणजे रे ऐवजी 'ते', 'जा' अशी अक्षरे सुद्धा एकटी चालू शकतात पण अर्थात बसली नसती.
सामोपचार ठेवा, ठेवा सदा जिव्हाळा,
होताच खुट्ट लावू, दावा म्हणू नका रे
आणखीन एक स्वल्पविराम असता तर 'खुट्ट लावू' म्हणजे काय असा प्रश्न पडला नसता. 'होताच खुट्ट' हा एक वेगळा शब्दप्रयोग 'लावू' या शब्दाशी अर्थाने जोडल्या जाण्यामागे स्वल्पविरामाची ऐच्छिक अनुपस्थिती आहे. स्वल्पविरामाशी 'खुट्ट' झाले आहे काय असे वाटावे! मागे आमच्या भागातील एका कवयित्रींनी आपल्या रचनेमध्ये 'काहीही केले तरी वजन घटतच नाही' याचे वर्णन करताना 'हल्ली माझा ३६च्या आकड्याशी ३६चा आकडा झाला आहे' अशी ओळ रचली होती. मी सभ्यपणे दुर्लक्ष केल्याचेही अंधुक आठवते आहे. ( मुक्तछंद होता! ) त्याची आठवण झाली. जिव्हाळा व सामोपचार हे समानार्थी शब्द पहिल्या ओळीत वापरून भावनेची तीव्रता वाढवण्यात यश मिळाले आहे. या दुसऱ्या शेरामुळे 'रे' चे प्रयोजन लक्षात आले. 'रे' मुळे कळकळ वाढण्यास बरीच मदत होताना दिसत आहे.
ही काळजे सशाची येतील काय कामा?
पडताच पान कोठे, धावा म्हणू नका रे
स्व. सुरेश भटांनी असे लिहून ठेवले आहे की गझलेतील शेरातील पहिल्या ओळीचा दुसऱ्या ओळीत प्रभावी समारोप व्हायला पाहिजे. पण दोन वेगळ्याच ओळी असतील तर तसे कसे जमणार? हा मूलभूत प्रश्न या शेरात अत्यंत निरागसपणे विचारण्यात आला आहे. सशाच्या काळजांचा काहीही उपयोग नाही या विधानानंतर 'कुठे एखादे पान जरी पडले तरी घाबरून अशी माणसे धावतात' हे विधान अपेक्षित असताना 'कुठे पान वगैरे पडले तर धावू नका' असे सांगण्यात आले आहे. पण जर काळीज सशाचे असेल तर धावणारच की? उलट 'धावा' म्हणायला सशाची काळजेच पाहिजेत! 'येतील काय कामा' ऐवजी 'फेकून देत जावा' असायला हवे होते. ( अरे? जावा हा एक काफियाच आहे म्हणा! त्यावर वेगळाच शेर होईल.)
ती बासरी निराळी, फुंकून प्राण गाते,
(पुंगीस गाजराच्या, पावा म्हणू नका रे)
'ओतून' ! ओतून प्राण! फुंकून प्राण म्हणजे प्राण फुंकले असा अर्थ निघू शकेल. बासरी फुंकून वाजवतात हे माहीत आहे. पण प्राण फुंकून बासरी वाजवणे अवघड आहे. प्राण फुंकून काहीच वाजवणे शक्य नाही. फक्त स्वतःचे तीन तेरा वाजवता येतील. या शेराच्या निर्मीतीमागची भूमिका अशी असावी: बासरी वाजवणाऱ्याचे कौशल्य (? ) पाहून ती बासरी स्वतःचे प्राण फुंकून टाकते व वाजते. एकदाच शेवटची वाजते बिचारी! हे बासरीवर गुदरलेल्या संकटाचे वर्णन आहे. त्यानंतर एकदम गाजराच्या पुंगीवर संकट ओढवले आहे. तिला पावा म्हणू नये असा फतवा जारी करण्यात आलेला आहे. ओतून या शब्दाने पहिल्या ओळीचा दुसऱ्या ओळीशी सशक्त संबंध लागला असता.
हे मोल कौतुकाचे ध्यानी असो जरासे,
फाजील लेखनाला, वा वा म्हणू नका रे
व्वा! सुंदर शेर आहे. अत्यंत कळकळीने रचलेला शेर! आवडला. मुद्दाही खरा आहे.
दोन्ही करात आहे सामर्थ्य प्रार्थनेचे,
उजवा कुणी, कुणाला, डावा म्हणू नका रे
अत्यंत सुंदर शेर! ( हा शेर गझलेपेक्षा तत्त्वज्ञानाचा वाटत आहे. ) मात्र, पहिली ओळ अत्यंत छान असून त्याचा अत्यंत सशक्त संबंध दुसऱ्या ओळीशी आहे. 'सामर्थ्य प्रार्थनेचे' या शब्दप्रयोगात या शेराचे सौंदर्य एकवटले आहे. एखाद्या हिंसक कवीने 'सामर्थ्य तोडण्याचे' वगैरे म्हणून रसभंगही केला असता. ( खासियत - भूषण कटककर ). मान गये. 'सामर्थ्य प्रार्थनेचे' मधून आदितीजींच्या हृदयातील 'कोमलतेचा ध्यास' व 'सार्वकालीन सत्याची ओढ' दोन्ही दिसत आहे. हा शेर म्हणजे माणूस वास्तवात कशा स्वभावाचा आहे याचे सरळ सरळ वर्णन करणारा वाटतो. 'क्रांतीस योग्य क्षमता' असा विचार 'सामर्थ्य प्रार्थनेचे' ऐवजी एखाद्या पुरुषाने मांडला असताही. 'सामर्थ्य प्रार्थनेचे' मध्ये स्त्रीत्वही दिसत आहे. एक शांतपणा आहे. एक क्षमाशीलता आहे. सुंदर शेर!