मला आमच्या एम. फील. च्या वर्गात असलेल्या एका मुलीच्या घरी कात्रजरोडला  जायचे होते. तिला पूर्व कल्पना ( वेळसुद्धा ) दिलेली होती.तिने पत्ता डायरीत लिहून दिला होता . त्या मुलीचे आडनाव "नारकर" आहे असे गृहित धरू. मी ठरलेल्या वेळेच्या (पंधरा मिनिटे शोधाशोधीसाठी गृहित धरून) आधी गेलो. तिने दिलेल्या पत्त्याप्रमाणे प्रथम गजानन महाराज मंदिरापाशी बसस्टॉपला उतरलो. तेथून सहजीवन सोसायटीची चौकशी करीत गेलो. ती सोसायटी अस्तित्वात होती; मात्र त्या सोसायटीमध्ये "नारकर" नावाचे एकही घर असल्याचे सिक्युरिटीकडील रेकॉर्डवरून जाणवत नव्हते. सिक्युरिटीने माझी डायरी वाचली नि पत्त्यामध्ये दोन वेगवेगळे पत्ते एकत्र असल्याचे लक्षात आणून दिले. मी तिला फोन लावला. तिने मला इकडून या, डावीकडे वळा वगैरे नेहमीच्या पद्धतीने माहिती दिली. मी मला काहीच माहित नसल्याने गोंधळात पडलो. शेवटी सिक्युरिटीने मला दोनपैकी एक पत्ता वेगळा करून  सांगितला. मी तेथे गेलो. तेथे नारकर आडनावाच्या एक वकील राहत होत्या. मला आणखीनच गोंधळात पडायला झाले. कारण मला जेथे जायचे होते त्या घरात एकच महिला व तीही ग्रंथालयाच्या क्षेत्रात काम करणारी होती. त्यांच्याकडे चौकशी केली पण त्यांनी याच आडनावाचे जवळपास कोणी राहात असण्याविषयी कानावर हात ठेवले. शेवटी पुन्हा परत जाण्याच्या विचाराने माघारी फिरलो. चालत चालत जात असताना एका ठिकाणी खुणेचा म्हणून तिने सांगीतलेला एका दुकानाचा बोर्ड पाहिला. खात्रीसाठी पुन्हा फोन केला. या घरावरून मी तीनदा गेलो होतो तेही सांगितले. " ग्रेट आहात" या शब्दांनी मला बरोबर असल्याची खात्री दिली . घरात गेल्यावर शोधाशोधीची सगळी कहाणी सांगितली. तिने आमची बरीच पत्रे त्यांच्याकडे ( नारकर वकील) जातात नि आम्ही असाच पत्ता देतो असे सांगितले. अनेक वेळा जाणाऱ्या पत्रांसाठी तिने दोन वेगवेगळे पत्ते एकत्र करून नेमका कोणता व्यवस्थितपणा आणला हे मला अजूनही कळलेले नाही. आपल्या  एकमजली घराची माहिती देताना तिने "आमची बिल्डिंग सोसायटीतल्या गजानन फ्लोअर मीलपासून तिसरी आहे "असे शब्द बापरून मला आणखीनच गोंधळात पाडले होते.