सदाशिव, शनिवार इ. पेठा नेमक्या कुठे सुरू होतात आणि कुठे संपतात हा पीएचडी करण्याजोगा प्रश्न आहे.

थोडेफार अपवाद सोडल्यास हा इतकाही गहन प्रश्न नसावा. जसे, लक्ष्मी रस्ता ही नारायण आणि सदाशिव पेठांमधली सीमा आहे. नारायण पेठ पोलीस चौकी ते लकडी पूल (संभाजी पूल) एवढा विभाग वगळता न. चिं केळकर रस्ता ही पार दुसऱ्या बाजूच्या शेवटापर्यंत (म्हणजे अप्पा बळवंत चौकापर्यंत) नारायण आणि शनिवार पेठांमधली सीमा आहे. तिथून पुढे मात्र नारायण आणि शनिवार दोन्ही पेठा संपून बुधवार पेठ सुरू होते.

नारायण पेठ पोलीस चौकी ते लकडी पूल (संभाजी पूल) एवढ्या विभागातसुद्धा पुन्हा माती गणपती ते लकडी पूल एवढ्या भागात या रस्त्याच्या दोन्ही बाजूला नारायण पेठ येते, आणि पलीकडे मुठा नदी असल्यामुळे त्यापलीकडे कोठे शनिवार पेठ असण्याचा प्रश्न उद्भवत नाही. राहता प्रश्न उरतो तो माती गणपती ते नारायण पेठ पोलीस चौकी एवढ्या विभागाचा. नारायण पेठ पोलीस चौकीपाशी ही सीमा माझ्या समजुतीप्रमाणे न. चिं केळकर रस्त्याच्या थोड्या उत्तरेकडे केळकररस्त्याच्या काटरस्त्याला पुढचा रस्ता जेथे येऊन काटतो त्या ठिकाणी आहे. (चूभूद्याघ्या. ) या ठिकाणापासून माती गणपतीला जोडणारा जो तिरका रस्ता आहे तो बहुधा मधल्या विभागात नारायण आणि शनिवार पेठांमधल्या सीमेचे काम पार पाडत असावा अशी माझी शंका आहे, परंतु खात्री नाही. किंवा एवढ्या छोट्या भागात थोडी संदिग्धता असण्याची (आणि म्हणूनच क्वचित्प्रसंगी स्वयंपाकघर एका पेठेत तर बाकीचे घर दुसऱ्या पेठेत असे प्रकार होण्याची) शक्यता आहे. (अर्थात त्याने पोष्टखात्याव्यतिरिक्त कोणाला काही फरक पडू नये.) पण बहुतांश भागात सीमारेषा सुस्पष्ट आहे.

शिवाय, माणसाला जो भाग परिचित असतो तिथल्या सीमा (बऱ्याचदा) सुस्पष्ट असतात, पण अनोळखी मुलखातले सीमाप्रश्न त्याला भेडसावू शकतात. जसे, मला नारायण आणि शनिवार पेठांमधली सीमारेषा (निदान सतराअठरा वर्षांपूर्वीची तरी - आता तो भाग ओळखू न येण्याइतका बदललाय! ) बऱ्यापैकी समजू शकते, पण मुंबईच्या उपनगरांमधल्या सीमारेषा (पूर्व-पश्चिम एवढे ढोबळ भेद सोडल्यास) मला काही केल्या समजत नाहीत. याउलट मुंबईच्या त्यात्या उपनगरात वाढलेली एखादी व्यक्ती कदाचित माहीम आणि वांद्रे, विलेपार्ले आणि अंधेरी किंवा गोरेगाव आणि मालाडमधली नेमकी सीमारेषा सांगू शकेल, परंतु अशा व्यक्तीस पुण्यातल्या पेठांमधल्या नेमक्या सीमारेषा सांगणे जमणार नाही. चालायचेच!

(स्वयंपाकघर आणि बाकीचे घर वेगवेगळ्या पेठांत असण्यावरून विरामचिन्हे चुकीच्या ठिकाणी घातल्यामुळे अथवा गरज आहे तेथे न वापरल्यामुळे होऊ शकणाऱ्या फालतू विनोदाचे एक उदाहरण आठवले. कोण्या एका वृत्तपत्रात छोट्या जाहिरातींच्या विभागात म्हणे पुढीलप्रमाणे एक जाहिरात एकदा छापून आलीः 'जागा भाड्याने देणे आहे. प्रशस्त, तीन खोल्या, सर्व दृष्टीने सोयिस्कर, भर बुधवारात संडास, बाथरूम स्वतंत्र.' त्यापुढे 'खेळती हवा' वगैरे अतिरिक्त आकर्षणांबद्दल काही मजकूर जाहिरातीत होता की नाही याबद्दल खात्रीलायक माहिती उपलब्ध नाही.)