(आश्चर्य वाटणे सापेक्ष असल्याने सर्वांना वाटावे अशी अपेक्षा नाही. टोपीकर पहिल्यांदा भारतात येतो तेव्हा त्याला मुंबईच्या लोकलची गर्दी पाहून फेफरे येते. मुंबईकराला त्याचे काय?)

टोपीकर पहिल्यांदा जेव्हा भारतात आला तेव्हा जर त्याला मुंबईच्या लोकलची गर्दी पाहोन फेफरें येतें तर हिंदुस्थानवर साम्राज्य चालवण्याच्या त्याच्या आकांक्षेवरचा सूर्य तेव्हाच मावळोन पुढचा अनर्थ टळता. परंतु हा हन्त! तसें होणें नव्हतें.

किंबहुना त्यापुढें मुंबईत लोकल आणोन तिला होणारी गर्दी पाहोन फेफरें येवोन टोपीकराने या मातीतून आपुले बस्तान कायमचें हलविलें असे आमुचें विनम्र प्रतिपादन आहें. पण लक्षात कोण घेतो?

त्या घराचा पोष्टल पत्ता काय? की पत्त्यावर दोन्ही पेठा येतील? पेठांच्या सीमा ठरवताना घर तेथे होते का? असल्यास हा गोंधळ टाळता आला असता का? यामुळे आश्चर्य वाटणे वगैरे ठीक आहे पण कायदेशीर बाबी उदा. सातबाराचा उतारा इ. वगैरे करताना या गोष्टीचा त्रास होतो का?

घराच्या पत्त्याच्या बाबतीत पोष्टखाते नेमके कसे ठरवते याबद्दल मला खातरजमा नाही, परंतु बहुधा घराचे (मुख्य) प्रवेशद्वार  ज्या पेठेत ती त्या घराची पेठ हे तर्कास धरून वाटते.

सातबाराचा उतारा हा जमिनीच्या तुकड्याच्या (प्लॉटच्या) संदर्भात असतो, घराच्या नव्हे, अशी माझी समजूत आहे. जमिनीच्या तुकड्याच्या बाबतीतसुद्धा जर संपूर्ण प्लॉट हा वेगवेगळ्या पेठांत असला तरी एकाच गावात (आणि त्यामुळे एकाच तलाठ्याच्या कार्यक्षेत्रात) येत असल्यास (आणि या बाबतीत तसा तो येत असावा) काही अडचण येऊ नये असे मला वाटते. सातबाराच्या उताऱ्यात जमिनीच्या तुकड्यांच्या चतुःसीमांचे विस्तृत वर्णन तसेही असतेच, त्या वर्णनाच्या तपशिलात थोडी भर पडावी, इतकेच. (अर्थात हा माझा अंदाज आहे. चूभूद्याघ्या. )

पेठांच्या सीमा ठरवताना जरी घर तेथे असते तरी त्या घराला वळसा घालून पेठांची सीमा ठरवायची झाल्यास इतक्या बारीक तपशिलात शिरणे व्यवहार्य होत नसावे, म्हणून तसे कदाचित करत नसावेत. परंतु दोन राज्यांच्या किंवा दोन देशांच्या हद्दीवर असे एखादे घर आल्यास कदाचित (करआकारणी, राष्ट्रीयता आणि/किंवा सीमांतरणाच्या प्रश्नांमुळे) तसे करणे आवश्यक भासावे. तरीही अशा सीमारेषा इतका विचार न करता नकाशावर काढल्याने एखाद्या घराचा दिवाणखाना अमेरिकेत तर झोपण्याची खोली कॅनडात अशी तुरळक उदाहरणे आहेत असे ऐकिवात आहे. फारा वर्षांपूर्वी अशा किमान तीन घरांचा उल्लेख देऊन 'टाईम' मासिकात एक लेखही आल्याचे आठवते.

यावरून एक विनोद सांगतात. फारा वर्षापूर्वी, सोविएत संघ अस्तित्वात असताना, रशिया आणि फिनलंड यांची सीमा निश्चित केल्यानंतर ती सीमा एका शेतकऱ्याच्या घरातून जाते असे लक्षात आले. तेव्हा त्या ठिकाणी ती सीमा ते घर एक तर संपूर्णपणे रशियात नाहीतर संपूर्णपणे फिनलंडमध्ये येईल अशी वळवावी, आणि कोणत्या देशात आपले घर असावे हे ठरवण्याची संधी त्या शेतकऱ्यास द्यावी असे दोन्ही देशांच्या सहमतीने ठरले. त्याप्रमाणे शेतकऱ्यास विचारले असता शेतकऱ्याने 'फिनलंड' म्हणून आपली पसंती सांगितली.

सोविएत संघाच्या अधिकाऱ्याने अर्थातच सोविएत संघाच्या बाजूने शेतकऱ्याचे मत वळवण्यासाठी त्याच्यावर दबावतंत्र वापरण्यास सुरुवात केली. 'हे बघ, सोविएत संघाने सामूहिक शेतीतून शेतकऱ्यांचे कल्याण व्हावे म्हणून किती प्रयत्न केले आहेत, शिवाय सोविएत संघात वैज्ञानिक प्रगतीही किती आहे, उपग्रह अवकाशात सोडलाय शिवाय अंतराळवीरही लवकरच पाठवू. (तशीही कुत्री पाठवली आहेच.) इतक्या प्रगत देशाचे नागरिक असावे असे तुला वाटत नाही? '

शेतकऱ्याने उत्तर दिले, 'सोविएत संघ हा अत्यंत प्रगत देश आहे, भव्यदिव्य आहे आणि तेथे जाणे माझ्या फायद्याचे आहे हे मलाही कळते. आणि खरे तर सोविएत संघात माझे घर सामील करायला मलाही आवडले असते. पण काय आहे, माझे वय झाले आहे, आणि या वयात तुमचा एखादा रशियन हिवाळा झेलण्याची माझी ताकद आहे असे मला वाटत नाही. तेव्हा माफ करा, मी फिनलंडातच बरा आहे.'