सध्या या ४९ ओ कलमाविषयी बरेच लिहून येत आहे.  त्यातील काही धादांत असत्य आहे.  ४९ ओ चा उद्देश मतदारांचा व पडलेल्या मतांचा मेळ घालणे हे असावे.  पूर्वीच्या कागदी मतपत्रिकांमध्ये दोन शिक्के मारून मतपत्रिका वाया जात असे.  इलेक्ट्रॉनिक मतदानात ही सोय नसल्याने ४९ ओ कलमाचा फोर्म भरून देता येतो.  या फॉर्ममध्ये उमेदवारांविषयी नापसंती वगैरे काहीही अभिप्रेत नाही.  असो.

मला या 'कोणीही नाही' वाल्या प्रचारकांचे म्हणणे नीटसे कळलेले नाही.  त्यातून काय साध्य करायचे आहे तेही कळत नाही.

माझ्या मतदारसंघात साधारण १५ ते २० उमेदवार निवडणूक लढवतात.  त्यातील मुख्य राजकीय पक्षांचे चार पाच उमेदवार सोडले तर बाकीचे अपक्ष मला माहीतही नसतात.  मग मी हे सर्व नालायक आहेत हे कोणत्या आधारावर म्हणायचे?  त्यांच्यातला एखादा खरेच चांगला असेलही!  निवडणूक रद्द करायची म्हटले तर अशा उमेदवारावर (आणि असा भावी प्रतिनिधी बाद झाल्याने स्वतःवर) अन्याय नाही का?

समजा लोकांनी हा पर्याय सीकारला आणि सध्याच्या परिस्थितीत १५०-२०० मतदारसंघातली निवडणूक रद्द झाली तर काय प्रसंग ओढवेल?  अशा परिस्थितीत सरकार स्थापना कशी होणार? की तिथे मात्र असतील तितक्या खासदारांमधून सरकार बनवलेले चालेल?

हा प्रस्तावित मार्ग रोगापेक्षा उपाय भयंकर अशा स्वरूपाचा वाटतो.