'जगन कमळ बघ' अशी काहीशी सुरुवात असलेला एक धडा (बहुधा पहिलाच धडा) बालभारतीच्या पहिलीच्या पुस्तकात माझ्या लहानपणी असे. त्यात थोडा फेरफार करून 'आई, कमळ बघ' या वाक्याचा कल्पक आणि समर्पक उपयोग भारतीय जनता पक्षाचे समर्थन करणाऱ्या एका (एका ओळीच्या) भित्तिलिखितात केलेला पाहिल्याचे स्मरते. ('आई' = 'काँग्रेस (आय)' - हिंदीत 'काँग्रेस (आई)' - 'आई = आय = इंदिरा' असा काही बादरायण संबंध असावा काय?)
आणीबाणीनंतरच्या पराभवानंतर काही वर्षांनी काँग्रेस पुन्हा फुटून इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली जो इंदिरा काँग्रेस पक्ष निर्माण झाला त्याला हात (पंजा) हे निवडणूकचिन्ह मिळाले. (जे बहुधा आजही आहे. ) त्यानंतर त्यापुढच्याच निवडणुकीच्या वेळेस विविध इंदिरा-काँग्रेसविरोधी गोटांतल्या खाजगी गप्पांमध्ये 'शोले'मधले 'ये हाथ नहीं, फाँसी का फंदा है' हे संजीवकुमारच्या तोंडचे वाक्य खूपच लोकप्रिय होते असे आठवते.