व्यवस्थित पत्ता न सांगणाऱ्यांना ब्रेक नसलेल्या मोटारमध्ये डांबून बसवून
तिला पाचव्या गिअरमध्ये टाकून सोडून द्यावे? जातील तेथे जातील! फिरतील
लेकाचे! आपल्याला फिरवतात तसे!
गाडी पाचव्या गिअरमध्ये टाकण्याची गोष्ट करताय म्हणजे बहुधा हाताने बदलण्याच्या गिअरची (अर्थात मॅन्युअल ट्रान्स्मिशन असलेली) गाडी असावी, स्वयंचलित गिअरवाली (अर्थात ऑटोमेटिक ट्रान्स्मिशन असलेली) नव्हे. अशा गाडीत इंजिन सुरू केल्यावर पहिले-दुसरे-मग तिसरे असे वेग वाढत जाईल तसे टप्प्याटप्प्याने गिअर न बदलता थेट पाचवे गिअर टाकल्यास इंजिन बंद पडेल (स्टॉल होईल). त्यामुळे गाडी पुढे जाणार नाही.
बरे, पाचव्या गिअरपर्यंत टप्प्याटप्प्याने गिअर बदलत जायचे म्हणजे गाडीत चालक (ड्रायव्हर) पाहिजे. मग तो हव्या त्या दिशेने गाडी नेऊ शकणार नाही काय? मग काय फायदा? फक्त ब्रेक नसण्याची अडचण राहील, पण योग्य गिअर आणि इग्निशन बंद करणे यांच्या एकत्रित वापरातून चालक गाडी बंद करू (पाडू) शकेल असे वाटते - फक्त थांबताना गाडीला जोरदार गचका बसेल एवढेच. म्हणजे उद्दिष्ट साध्य होणार नाहीच.
म्हणजे ड्रायव्हर 'आपला माणूस' पाहिजे, आणि त्याने गाडी पाचव्या गिअरपर्यंत आणून गाडीतून उडी मारून बाहेर पडले पाहिजे.
समजा चालकाने गाडी पाचव्या गिअरपर्यंत आणून मग गाडीतून उडी मारून बाहेर पडायचे ठरवले, तरी १. चालकाचा पाय मोडेल, आणि २. चालकाने उडी मारल्यावर ऍक्सलरेटर दाबलेला न राहिल्याने दाडीचा वेग हळूहळू कमी होईल, आणि मग तो पाचव्या गिअरने हाताळण्याजोग्या वेगापेक्षा कमी झाला, की पुन्हा इंजिन स्टॉल होऊन बंद पडेल. मग उतारू (पाय न मोडता) आरामात बाहेर पडू शकतील. (बिचारा ड्रायव्हर! )
स्वयंचलित गिअरवाली गाडी असेल तरी या परिस्थितीत खूप मोठा फरक पडू नये. फक्त इंजिन स्टॉल होऊन बंद पडणार नाही एवढेच. इंजिन सुरू करून ड्राइव्ह गिअरमध्ये टाकून (चालकाशिवाय) नुसती गाडी सोडून दिली तर अतिशय संथ गतीने पुढेपुढे जात राहील, ज्यायोगे उतारू पाय मोडून न घेता सहज उड्या टाकून बाहेर पडू शकतील. याउलट सुरुवातीला चालकाने गाडीला चांगला वेग देऊन नंतर उडी मारून चालक बाहेर पडला, तर पुन्हा ऍक्सलरेटर दाबलेला न राहिल्याने वेग कमीकमी होत जाईल आणि लवकरच अतिशय मंदगतीने गाडी पुढेपुढे जात राहील. (पण बंद पडणार नाही. ) पण अंतिमतः गाडीचा वेग इतका कमी झालेला असेल की उतारू पाय मोडून न घेता सहज उडी मारून बाहेर पडू शकतील.
गाडी स्वयंचलित असो किंवा हस्तचलित, जर चालकाने सुरुवातीला वेग द्यायचा झाला तर चालक उडी मारून निसटताना पाय मोडून घेणार हे निश्चित आहे, उलट प्रवाशांना इजा ही केवळ गाडी बंद होण्यापूर्वी अथवा संथगती होण्यापूर्वी जर गाडी कशाला धडकली तरच होऊ शकेल. अर्थात चालक बाहेर पडल्यानंतर गाडी वेगात फार पुढे जाणार नसल्यामुळे याची शक्यता शून्य नसली तरी कमी आहे, उलट ही शक्यता वाढवण्यासाठी चालकाने उडी मारण्यापूर्वी वेग जेवढा वाढवावा, तेवढीच जास्त इजा चालकाला होण्याची निश्चिती आहे.
(गाडीला क्रूझ कंट्रोल असेल तर ऍक्सलरेटरवर दाब न राहिल्याने गाडीचा वेग कमी होण्याचा प्रश्न सुटेल, पण १. ड्रायव्हरचे पाय तरीही मोडतीलच, आणि २. क्रूझ कंट्रोल असलेल्या महागातल्या गाडीची वाट लावण्याच्या लायकीचा हा प्रश्न खरोखरच आहे काय?)
आणि पाय मोडून घेण्याची खात्री असताना कोणता ड्रायव्हर तयार होईल? म्हणजे ड्रायव्हरचे काम आपल्यालाच करावे लागेल.
तात्पर्यः जो दुसऱ्यासाठी खड्डा खोदतो, तो त्याच खड्ड्यात स्वतःचेच पाय मोडून घेतो.