मला राहून राहून एक गोष्ट समजत नाही की मातृभाषेवरील प्रेम म्हणजे नक्की काय?

आपण ज्या समाजात, ज्या ठिकाणी जन्मतो तेथील भाषा ही आपली मातृभाषा होऊ शकते किंवा होते.

एखाद्या भारतीयाला अमेरिकेत स्थायिक झाल्यानंतर झालेल्या मुलाची मातृभाषा ही मराठी समजली तरीही ९९ % वेळा ते मूल स्थानिक भाषेतच बोलणार, कारण ती त्याची गरज आहे.

मला मराठीबद्दल प्रेम वाटते म्हणजे नक्की काय होते? जास्तीत जास्त मराठी बोलावेसे, लिहावेसे वाटते / लोकांनी शक्य तेथे मराठीचा वापर करावा असे वाटते वगैरे वगैरे!

पण भाषेवर समाज अवलंबून असतो की समाजावर भाषा? म्हणजे आजच्यापेक्षा दुप्पट प्रमाणात मराठी बोलले, लिहिले वा वाचले जायला लागले तर :

१. मराठी माणूस किंवा समाज प्रभावशाली होईल काय?

२. मराठीला इतर भाषिकांच्या दृष्टीने जास्त महत्त्व मिळेल काय? 

३. काही सवलती मिळतील काय?

माझे असे स्पष्ट मत आहे की भाषेचे प्रेम ही एक काल्पनिक गोष्ट आहे. जिथे कुणीही मराठी बोलत नाही तिथे मराठी माणूस हे प्रेम जतन करू शकणार नाही. मग जिथे अतिशय कमी लोक मराठी बोलतात तिथे उगाच मराठीचे नगारे का पिटवायचे समजत नाही.

( भारतात हिंदी खालोखाल तेलगू व नंतर गुजराती/मराठी अशा भाषा येतात. - बोलणाऱ्या लोकांच्या संख्येनुसार )

ज्या भाषेत संभाषण होऊ शकते किंवा संभाषण करणे योग्य वाटते ती आपली भाषा असे माझे मत आहे.

वेलिंग्टन टेस्ट ड्रॉ - हे विधान एखाद्या नॉन मराठी परंतु देवनागरीची थोडी ओळख असलेल्या माणसालाही कळेल. अनिर्णीत म्हंटले तर कळेलच असे नाही. तेव्हा ड्रॉ योग्य मानायला हरकत नसावी.

१. भाषेचे प्रेम आहे म्हणून कुणी वर्षभरात मी मराठीमध्ये ३ नवीन शब्द निर्माण करीन असे ठरवले आहे काय?

२. भाषेचे प्रेम आहे म्हणून कुणी जिथे शक्य नाही तिथेही मराठीतच करीन नाहीतर व्यवहार करणार नाही असा स्टँड घेतला आहे काय?

३. भाषेचे प्रेम आहे म्हणून कुणी अ-मराठी अशा ३ माणसांना वर्षभरात बऱ्यापैकी बोलता येईल इतपत मराठी शिकवीन असे ठरवले आहे काय?

४. भाषेचे प्रेम आहे म्हणून कुणी 'वास्तवात विशेष गुणी नसलेल्या परंतु समभाषिक असलेल्या कलाकारांना / साहित्यिकांना' डोक्यावर घेऊन नाचले आहे काय? उलट मराठी भाषिक यासाठी कुप्रसिद्ध आहेत.

माझ्यामते मराठीचा अभिमान आहे असे सप्रमाण ( काही ना काही दाखले पाहिजेत ) सिद्ध करावे नाहीतर असले मुद्दे काढू नयेत.

( अवांतर - मागे मी असेच विचार प्रदर्शित केल्यावर त्यांच्या प्रदर्शनावर तत्कालीन अधिकाऱ्यांनी अत्यंत अपमानास्पद पद्धतीने व कुठलीही चर्चा न करता कुऱ्हाड चालवल्यामुळे मी काढता पाय घेतला होता. आता बहुधा इथेही तेच होण्याची शक्यता मला वाटत आहे. परंतु मी माझ्या मतांशी ठाम आहे. )

( अवांतर - तसेच ज्या इनिशिएटिव्हवर मी माझ्या प्रतिक्रिया दिल्या होत्या, नुकतेच असे समजले की ते इनिशिएटिव्ह अजून अर्धा टप्पाही पार करू शकलेले नाही. तसेच ते कधी मूर्त रूप घेणार याबाबत आत्ता काहीही सांगता येत नाही. मात्र 'हॅफ अ मिलिएन' मराठी रुपये जमलेले आहेत हे समजले. )