यावरून एक विनोद आठवला. अवांतर आहे पण ह्यावरून आठवला तर सांगेनच म्हणतो.
अमेरिकेतल्या एका छोट्या खेड्यातला एक बऱ्यापैकी वयस्कर शेतकरी एकदा बायकोमुलासह पर्यटनासाठी म्हणून मोठ्या शहरी जातो आणि एका बड्या बहुमजली हॉटेलात उतरतो. सकाळी ब्रेकफास्टसाठी म्हणून मुलाबरोबर लॉबीमध्ये जातो. (बायकोची अजून तयारी झालेली नसते. )
आता या सद्गृहस्थाने काय किंवा त्याच्या समस्त खानदानाने काय, एवढे मोठे शहर, त्यात एवढे प्रचंड हॉटेल, त्यातल्या सुखसोयी वगैरे आयुष्यात प्रथमच पाहिलेले असते, त्यामुळे त्याला सगळ्याचेच अप्रूप असते. तर लॉबीमध्ये त्याला सर्वप्रथम काय दिसते तर एलेव्हेटर (लिफ्ट).
आता या प्राण्याने अर्थातच लिफ्टही पहिल्यांदाच पाहिलेली असते त्यामुळे त्याला हे काय आहे ते न कळल्यामुळे तो कुतूहलाने पाहत राहतो. एवढ्यात हॉटेलमध्येच उतरलेली एक वृद्ध स्त्री लिफ्टसमोर उभी राहते आणि लिफ्टचे बटन दाबते. थोड्या वेळाने लिफ्ट येते, लिफ्टचे दार उघडते, ती वृद्धा लिफ्टमध्ये शिरते, दार बंद होते आणि लिफ्ट गंतव्यस्थानाकडे चालू पडते.
आपला शेतकरी अचंब्याने या दृश्याकडे पाहत राहतो. एवढ्यात लिफ्ट परत येते आणि लिफ्टचे दार उघडून त्यातून एक आकर्षक तरुणी बाहेर पडते.
शेतकरी उत्साहित होऊन आपल्या मुलाला म्हणतो, 'जा! ताबडतोब आपल्या आईला बोलावून आण!'