खाणे काय वजन काय किंवा व्यसन काय कोणतीही गोष्ट आपण स्वतःला विसरतो त्यामुळे नियंत्रणा बाहेर जाते.
अत्यंत साधी गोष्ट आहे: अन्न निर्जीव आहे त्यामुळे तृप्तीही अन्नात नसून खाणाऱ्यात आहे. जे अन्न तुम्हाला तृप्त करते ते शरीराला अपाय करूच शकत नाही पण आपण स्वतःला विसरून डॉक्टर, वजन, भीती या सगळ्याचा विचार खाताना करतो त्यामुळे खाताना मन, शरीर आणि आपण एकसंध नसतो आणि खाणं तृप्तिदायक होत नाही. खरं तर आपण शरीराला काय हवंय यापेक्षा मनाच्या उहापोहानेच खातो. आपण भूक लागली म्हणून खात नाही तर वेळ झाली, अमक्याचे काय अपाय आहेत तमके किती उपयोगी आहे, वाया जाईल, असे विचार करत आणि खाण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करत खातो त्यामुळे ज्या भोजनानी जीवन उत्सव व्हायला पाहिजे ते भोजन निव्वळ नित्यकर्म होऊन बसले आहे.
मी तुम्हाला ग्वाही देतो तुम्ही अत्यंत अनावर भूक लागल्यावर खा. भूक हा निसर्गाचा निर्देशक आहे. ती भूकच तुम्हाला काय खावे आणि किती खावे हे सांगेल. तुमच्या शरीराला काहीही अपाय होणार नाही. तुमचे वजन योग्य राहील. तुमचे प्रत्येक भोजन हा उत्सव आणि कृतज्ञता होईल. तुम्हाला प्रत्येक जेवणातून तृप्ती मिळेल आणि अन्नाला ब्रह्म का म्हटले आहे ते कळेल.