सर्वप्रथम अभिनंदन की आपली एक 'मनापासूनची' गझल वाटणारी गझल वाचायला मिळाली. अन्यथा मी प्रतिसाद दिला नसता.
या गझलेचे केलेले विडंबन अत्यंत निरर्थक व वाह्यात आहे हे मी त्या विडंबनावर लिहिलेच आहे.
आपल्या या गझलेवर माझी मते नम्रपणे देत आहे. आपण विचारात घ्याल अशी आशा आहे.
ये, पुन्हा शोधू जुने क्षण आपले!
य़े पुन्हा, गाणे पुन्हा म्हण आपले!
सुंदर मतला! अतिशय गझलेचा मतला.
जाणवे शब्दांविना, स्पर्शांविना...
केवढे नाते विलक्षण आपले!
हाही शेर तसाच! सुंदर शेर!
काढल्याने माप कोणाचे असे...
उंच का होई खुजेपण आपले?
इथे अनावश्यक घसरण झाली आहे असे वाटते. ( गझलेच्या स्वभावामध्ये ). पहिल्या दोन शेरांच्या प्रकृतीला उगीचच तडे देणारा शेर!
आपल्यांची भोवती गर्दी किती...!
यातले नक्की किती जण आपले?
छान! परत गझलेचा शेर! एक व्यथा जी अनेकांना जाणवते, ती मांडणे, तेही अत्यंत साध्या शब्दात, हे गझलेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे, जे इथे पाळले गेले आहे.
जायची तर रात्र जा विसरून ती...
चांदणे स्मरशील ना पण आपले?
छान शेर! सहज सुचलेला वाटावा असा, मात्र अर्थपूर्ण शेर!
थेट कोणीही घुसे परका इथे...
राहिले आता न अंगण आपले!
पहिल्या ओळीतील आक्रमकता एकंदर गझलेच्या प्रकृतीपेक्षा बरीच भिन्न! यात एक निराशा जास्त जाणवते, व्यथेपेक्षा! राहिले आता न अंगण आपले ही ओळ मात्र एकंदर गझलेला शोभून दिसणारी. पहिल्या ओळीत बाह्य परिस्थितीपेक्षा स्वतःचे स्थान मांडले जायला हवे होते असे मला वाटले. 'आपले अस्तित्व परके वाटते' वगैरे सारखे काहीतरी! ( चु. भु. दे̱. घे.)
जन्मभर माझे-तुझे, माझे-तुझे...
जन्मभर चालेल भांडण आपले!
सपाट शेर! पहिल्या ओळीतील अर्थाचीच दुसरी ओळ आहे.
वाहणे जमणार नाही यापुढे...
गोठवू संबंध आपण आपले!
अतिशय सुंदर शेर! शब्दांची निवड व मुद्दा, या दोन्ही अर्थांनी!
मान्य की, मोठीच ही पृथ्वी तशी...
फार छोटे, फार, रिंगण आपले!
आपल्या गझलांमध्ये जाणवणारी गोटीबंदता इथे जाणवत नाही. फार हा शब्द दोनदा घेऊन भावनेची तीव्रता मांडण्याचा हेतू दिसत आहे. पण 'च', 'ही' 'फार या शब्दाची पुनरावृत्ती' वगैरे गोष्टी टाळाव्यात असे मुद्दे मी आपल्या गझला वाचूनच शिकलो आहे.
आपल्या गझलांमध्ये बहुतांशी जाणवणारे काही मुद्दे इथेही प्रकर्षाने जाणवत आहेत. 'विश्वाची निर्मीती' याबाबत अचंबा प्रकट करणे, संवादरुपी ओळी लिहिणे वगैरे.
पण मी प्रतिसाद देण्याचे एकमेव कारण म्हणजे आपली ही गझल मला आपल्या मनाचा आरसा वाटली, जे अनेक महिन्यात आपल्या गझला वाचून मला वाटलेले नव्हते.
आदरासहित धन्यवाद!