सुरेश भट महान की ग दि मा हा माझा मुद्दाच नव्हता. ( व्यक्तिशः मला भट महान वाटतात. कारणे २ - गझल या काव्यप्रकाराची या भाषेला देणगी गेणे व सच्चेपणा काव्यात आणणे. )
सच्चेपणा - पुन्हा मी तेच लिहितो की काव्य म्हणजे आत्माविष्काराची वस्तुनिष्ठ नवनिर्मीती!
आपल्याला जे अनुभव आले ते असे लिहिणे की ते लिहिल्यानंतर ते फक्त आपले अनुभव न राहता एक प्रमेय, एक सार्वजनिक व्यथा, एक सार्वकालीन सत्य, एक कुणालाही नुसते वाचून अनुभवता येईल अशी घटना होणे!
ती एक नवनिर्मीती असते. म्हणजेः
दोन माणसांना जर साधारण एकाच विषयावर लिहायचे असेल ( दोघेही कवीच आहेत हे गृहीत धरणे ) तर ते तो कसा मांडतात पहाः
नाकर्दा गुनाहोंको भी हसरत की मिले दाद
या रब अगर इन कर्दा गुनाहोंकी सजा है - गालिब
( मला केलेल्या पापांची शिक्षा मिळणार असेल तर हे देवा, 'मला करायचा मोह झाला होता पण मी जी पापे तरीही केली नाहीत त्याला तुझ्याकडून बक्षिस मिळायला पाहिजे )
उंचे उंचे मुजरिमोंकी पूछ होगी हश्रमे
कौन पुछेगा मुझे मै किन गुनहगारोंमे हुं - अज्ञात
( इतक्या मोठ्या मोठ्या आरोपींची चौकशी तिथे होणार आहे, की माझ्याकडे कुणाचे लक्ष जाणार आहे? )
यात अज्ञातचे म्हणणे हे अगदीच साधे वाटते. माझ्यापेक्षा बरेच मोठ्ठाले गुन्हेगार इथे आहेत असे. पण गालीबचे म्हणणे हे वाचणाऱ्याला 'अरे हो, खरंच की' म्हणायला लावू शकेल. "मलाही काय काय करता आले असते, मलाही काय काय करायचे होते, पण कुणाच्यातरी किंवा कशाच्यातरी भीतीने म्हणा किंवा विवेकाने म्हणा मी ते केले नाही. ही गोष्टही दाद देण्यासारखीच आहे की! " असे.
गालीबचा वरील विचार हा त्यामुळे सार्वकालीन होऊ शकतो. सार्वजनिकही होऊ शकतो. तो कुठल्याही भूप्रदेशातील, कुठल्याही काळातील लोकांना ऍप्प्लिकेबल होऊ शकतो. असे विचार निर्माण होण्यासाठी मुळात रचनेमध्ये सच्चेपणा असणे आवश्यक आहे. 'आपल्याला जे वाटते ते अत्यंत नाट्यमय किंवा अचंबीत करणाऱ्या पद्धतीने नोंदणे व त्यातून एक कुणालाही जवळचे वाटेल असे विधान निर्माण करू शकणे' हा सच्चेपणाचा 'माझ्यामते' दाखला आहे. तसेच हा सच्चेपणा 'सर्व रचनांमध्ये असायला हवा'. एखाद्या किंवा १०% वगैरे नाही, असेही माझे मत आहे.
असा सच्चेपणा गदिमांच्या किती रचनांमध्ये आहे याचा थोडासा अंदाज असल्यामुळे मी तसे मत मांडले होते. तसेच त्यांच्या पातळीबाबत बोलण्याची माझी क्षमता माझ्या या किंवा पुढच्या कदाचित कुठल्याही जन्मात माझ्याकडे येणार नाही हे मीही मान्य करतो, पण जो मुद्दा आहे त्यावर लोकशाहीमध्ये 'जे वाटले' ते लिहिता येते असे वाटल्यामुळे मी ते लिहिले. बाकी गदिमांना 'प्रणाम आहे' असे म्हणण्याचीही माझी कुवत नाही हे मी जाणतो.