एखाद्याने आपल्याला मराठी म्हणून वगैरे ओळखावे हे आपल्याला का वाटते?
याचे कारण आपण जिथले असतो त्या भाषेवर, जागेवर वगैरे आपले प्रेम असते व इतरांनी त्याचा आदर करावा अशी आपली सुप्त इच्छा असते.
याचाच अर्थ हा की तो आपला प्रतिष्ठेचा प्रश्न असतो.
अन हा प्रश्न का निर्माण होतो तर फक्त याचमुळे की आपण त्या भाषेत, त्या राज्यात वगैरे जन्मलो म्हणुन!
मग आपण गुजराथी, तमीळ वगैरे लोकांपेक्षा वेगळे कुठे आहोत?
याचाच अर्थ हा की मराठी लिहिले/बोलले/वाचले जावे यात आपला अभिमान सुखावत असतो. त्या भाषेला त्याचा फार काही फायदा असतो असे नाही. तसेच त्याचा आपल्याला काही व्यावहारिक फायदा होतो असे नाही.
मग फक्त आपला अभिमान सुखावणाऱ्या घटना घडत राहाव्यात अशी अपेक्षा का करायची?
चुपके चुपके ही अफाट गाजलेली गझल रचणारे मोहानी हे टिळकभक्त होते म्हणतात. आपल्यात जे चांगले असेल त्याचा आपोआप लोक आदर करतीलच की?
याच संकेतस्थळावर अनेक गझला रचणारे हेही जाणतात की तो काव्यप्रकार उर्दू/फारसी मध्ये प्रथम निर्माण झाला. म्हणजे आपण जे चांगले आहे त्याचा आदर करतोच ना?
माझे असे मत आहे अशी तमाम माणसे ज्यांना 'मराठीला चांगले दिवस यावेत असे वाटते' त्यांनी या भाषेत काही शब्द वाढवावेत, मराठी बोलणाऱ्यांना किंवा अशा संस्थांना काही ना काही सवलती मिळण्यासाठी प्रयत्न करावेत. ते झाले भाषेचे प्रेम.
आता पहाः मला नेहमी एक प्रश्न पडतो. मराठी 'आकार' या शब्दाला इंग्लीशमध्ये 'साईझ' व 'प्रोफाईल' असे दोन शब्द आहेत. म्हणजे आपण जेव्हा 'प्रचंड' म्हणतो तेव्हा तो 'साईझ' असतो अन जेव्हा वर्तुळाकार म्हणतो तेव्हा तो 'प्रोफाईल' असतो. प्रोफाईलला मराठीमध्ये नेमका कोणता शब्द आहे हे मला माहीत नाही. पण बहुतेक असेलही. पण जर यदाकदाचित नसेल तर तसा शब्द 'मराठीप्रेमींनी' निर्माण का करू नये? हे फक्त एक उदाहरण झाले, जे माझ्या माहितीच्या कमतरतेमुळे चुकीचेही ठरेल. पण असे काही इतर शब्द इतर भाषांमध्ये असतीलही ज्याला मराठीमध्ये समर्पक शब्द नसेल.