मात्र एखाद्याने खाल्लेल्या अन्नाची पचनसंस्थेतून बळजबरीने विल्हेवाट लावण्यासाठी जुलाब होण्याच्या गोळ्या घेणे हे जसे अनैसर्गिक आहे त्याचप्रमाणे खाऊन थुंकणे किंवा ओकणे हे अनैसर्गिक आहे.

जुलाबाच्या गोळ्यांबद्दलच्या आणि खाऊन ओकण्याबद्दलच्या (ते अनैसर्गिक असण्याबद्दलच्या) भागाशी सहमत आहे. खाऊन थुंकण्याबद्दलचा भाग तितकासा पटला नाही.

मला जे वाटते त्यामागील पाया पुढीलप्रमाणेः

१. आपण (कोणत्याही एका वेळेस) जे अन्न खातो त्याचा सर्वच अंश शरीराला आवश्यक नसतो.
२. जो अंश आवश्यक असतो तो अंश आपले शरीर वापरते. उरलेला अंश एक तर शरीर साठवून ठेवते किंवा फेकून देते (उत्सर्जन करते).
३. कितीही मोजूनमापून खाल्ले तरी आपल्या कोणत्याही एका वेळच्या अन्नाचा काही भाग हा शरीर वापरू शकत नाही; किंबहुना तो उत्सर्जनासाठीच असतो. जसे, आपण ज्या भाज्या, पालेभाज्या, फळे अथवा अन्य वनस्पतिजन्य पदार्थ खातो, त्यात सेल्युलोझ असते. सेल्युलोझ पचवण्याची शक्ती बकरीसारख्या प्राण्यांत असते, परंतु मानवी शरीरामध्ये ती क्षमता नाही. मानवी शरीर विष्ठेतून फेकून देण्याव्यतिरिक्त सेल्युलोझचे काहीही करू शकत नाही. किंबहुना सेल्युलोझ हे केवळ विष्ठेला मऊपणा देण्याचे कार्य करते, अन्यथा पचनाच्या दृष्टिकोनातून मानवी शरीराला त्याची काहीही आवश्यकता नसते आणि त्यावर मानवी पचनसंस्था काही प्रक्रियाही करू शकत नाही. (सेल्युलोझ खाल्ले नाही तर बद्धकोष्ठ होणे यापलीकडे आपले काहीही बिघडणार नाही, आणि घन अन्न न खाता केवळ द्रव अन्न किंवा अन्नसत्त्वांच्या गोळ्या खाऊन जर मलविसर्जनाची - घन अनावश्यक द्रव्यांच्या उत्सर्जनाची -  आवश्यकता जर कमीत कमी करता आली, तर कदाचित त्यानेही फारसा फरक पडू नये.)
४. आपले तोंड, जीभ आणि लाळग्रंथी हाही पचनसंस्थेचाच एक भाग आहे.
५. तोंडाद्वारे थुंकून द्यायला कष्ट पडत नाहीत अथवा एकंदरीत पचनसंस्थेवर ताण पडत नाही किंवा पचनसंस्थेला इजा पोहोचणे संभवत नाही. उलटी काढणे अथवा जुलाबाच्या गोळ्या घेऊन जबरदस्ती करणे (यात 'जबर' आणि 'दस्त' यांवरील श्लेष अभिप्रेत आहे. ) यांत  तसे होऊ शकते.

अशा परिस्थितीत, अन्नातील आवश्यक तेवढ्याच भागावर प्रक्रिया करून पचनसंस्थेला ताण न देता अथवा पचनसंस्थेला इजा न पोहोचवता अनावश्यक भागाचे उत्सर्जन करणे हे केवळ असे उत्सर्जन पचनसंस्थेच्या कोणत्या टोकाकडून होते यावर ते कमी किंवा अधिक नैसर्गिक हे कसे ठरवायचे, ते कळले नाही.

बाकी नासाडीचा मुद्दा समजण्यासारखा आहे, परंतु तोही सापेक्ष असू शकतो असे सुचवावेसे वाटते. नासाडीच्या सापेक्षतावादावरही प्रबंध लिहिता येईल, परंतु तूर्तास एवढेच.