भूक लागणे यात (१)  पोटात अन्‍न ठेवायला जागा असणे. (२) खाण्याची इच्छा असणे आणि ती अन्‍न समोर आल्यावरही कायम राहणे या दोनही गोष्टींचा समावेश होतो.  शिवाय अन्‍नप्राशनास पुरेशी स्वच्छ आणि सोईस्कर बिनदाटीची आजूबाजूला भिकार्‍यांची गर्दी नसलेली जागा असणे. अन्‍न खाता येईल अशी आपली शारीरिक स्थिती असणे. उदाहरणार्थ, लोकलमध्ये एका पायावर लटकत असताना पोटात कितीही भूक असली तर ती भागवणे शक्य नाही. अंगात ताप नसणे, पोट बिघडलेले नसणे, अन्‍न आपल्या सरावाचे असणे हेही गरजेचे. रोज भाकरी खाणार्‍याला समोर रसम ओतलेला भाताचा डोंगर ठेवला तर त्याची काय स्थिती होते ते मनातल्या मनात अनुभवून पहावे. खाण्यासाठी आपल्याकडे सवड असणे आणि घड्याळाने काही विशिष्ट वेळ दाखवणे आवश्यक.  रात्रीचे दोन वाजले असतील आणि बाकी सर्व गोष्टी अनुकूल असतील तर खाता येईलच असे नाही. अन्‍नाला चव हवी, जवळ पाणी हवे, पान व्यवस्थित वाढलेले असावे, पानात मीठ, मिरची, कांदा, पापड इ. चवीला  परिपूर्ण करणारे पानपूरके असावीत वगैरे.  शिवाय चमचे वाट्या इत्यादी हव्यात. यांतल्या एकदोन गोष्टी जरी कमी असतील तरी जेवण जाणार नाही.

एवंच काय की, भूक लागली की खावे ही फक्त बोलण्याची गोष्ट आहे.  प्रत्यक्षात असे काही नसते.  भुकेचा आणि खाण्याचा दूरान्वयाचा संबंध असतो.(खरे तर, अन्वय=संबंध. त्यामुळे ही पिवळ्या पितांबरासारखी टॉटॉलॉजी असली तरी इथे वापरल्यावाचून राहावत नाही.)भूक नसली तरी गरजेपोटी खाता येते, तेवढी पोटात जागा असतेच. आणि असे खाल्लेले अन्‍न पचणे अजिबात अवघड नसते. मुंबईसारख्या शहरात हा नित्याचा अनुभव आहे.