पुण्यातल्या लोकाना आपल्या बुद्धीचा फार अभिमान आहे पण वाहतुकीचे नियम पाळावे एवढं काही त्यांच्या सुपीक डोक्यात रुजत नाही.

मागे मी मनोगतावर माझ्या एका मित्राच्या इरसालपणाचे किस्से लिहिले होते. या मित्राचा पुण्याशी २-३ वर्षांपेक्षा जास्त संबंध आलेला नाही पण ज्या मनोगतीनी प्रतिक्रिया दिल्या त्यानी ठामपणे सांगितले की हा इरसालपणा नसून पुणेरीपणाच होय. म्हणजे पुणेरीपणा या शब्दाची काहीतरी व्याख्या या मंडळीनी करून ठेवली आहे पण ते ती इतर लोकाना सांगत नाहीत. पण एकूणच अविर्भाव असा की जणू इतर प्रदेशातील लोक बुद्धीमान किंवा हजरजबाबी असणं शक्यच नाही. 

पुणे आणि मुंबईची तुलना करू नये असे मला वाटते. पुण्याची तुलना नाशिक, नागपूर वगैरेशी करावी फार तर. मुंबई हे एक फार मोठे शहर आहे आणि तिथल्या समस्या पुण्यापेक्षा वेगळ्या आहेत. मुंबई साधारण ६०-७० च्या दशकांमध्ये फार सुंदर होती असं मला वाटतं. पण नंतर ती नको तितक्या लोकाना आवडू लागल्याने बकाल होत गेली. पुण्यात तितक्या लोकांचा लोंढा आला तर पुण्याची अवस्था मुंबईपेक्षा वाईट होईल यात शंका नाही. या दोन शहरांच्या संस्कृतीमध्येही मूलभूत फरक आहे. मुंबई मध्ये जमवून घेण्याची आणि एक मोकळेपणाची वृत्ती दिसते तर पुण्यात मात्र तिरसटपणा आणि "चहा घेउनच आला असाल नं" किंवा "चहा घेउन येतो" ही वृत्ती.