जा मुक्त तू साऱ्या जुन्या शपथातुनी
जा मुक्त तू साऱ्या नव्या वचनातुनी
'हो मुक्त तू' किंवा 'जा मुक्त हो' असे ऐकायची किंवा वाचायची सवय असते. 'जा मुक्त तू' मध्ये 'मुक्तपणे किंवा मुक्त होउन जा' असे म्हणायचे आहे. म्हणजे नुसतेच 'मुक्त हो' असे नसून 'जा' ही इच्छा प्रदर्शित झाली आहे. यात एक तिटकारा किंवा फ्रस्ट्रेशन आहे. बेसिकली दोन्ही ओळींमध्ये एकच मुद्दा वाटतो. यातून कदाचित त्या विशिष्ट भावनेची तीव्रता सुचवायची असावी. एक सौंदर्यस्थान हे की 'जुन्या शपथा' व 'नवी वचने' यात हल्ली हल्ली 'शपथा' घेतल्या जात नाहीत, नुसते वचनांवर भागायला लागले आहे, असेही सुचवायचे असावे. तसेच, नवी वचने काही दिलीच असली तर जिथे मुळात जुन्या शपतहंमधूनच मी तुला मुक्त करतोय तिथे नवीन 'वचनांचा' प्रश्नच कुठे येतो असेही म्हणायचे असावेसे वाटते. ती तर साधी वचने आहेत. मतला स्वगत किंवा प्रेयसी किंवा आजकाल तितक्या तीव्रतेने मैत्री न पाळणाऱ्या मित्राला उद्देशून आहे असे गृहीत धरल्यास मजा येईल.
माझ्यातुनी केले वजा आहे तुला
शून्यात आलो परतुनी शून्यातुनी
( माफ करा, पण कवीच्या मृत्यूसंदर्भात मी रचलेला एक शेर मला आठवला)
मारल्या गप्पा स्मशानी अन निघाली माणसे
शुन्य शुन्यातून वजा झाले म्हणाली माणसे
पण माझ्या त्या शेरापेक्षा खूपच संवादरुपी व 'फक्त बातमी' नसलेला असा जयंता ५२ यांचा हा शेर आहे. यात एक निराशा आहे. कदाचित, मनात नसताना मनातून त्या व्यक्तीला वजा करायला लागलेले असावे अशी! 'तुझ्या बरोबर असतानाही त्या असण्याला काही अर्थ नव्हता अन आताही काही अर्थ नाही' अशा स्वरुपाचे विधान आहे. यात त्या व्यक्तीबद्दल एक चीड तर आहेच पण त्या व्यक्तीला गमावायला लागल्याचे दुःख पण आहे.
केले वजा आहे तुला माझ्यातुनी
शुन्यात आलो परतुनी शून्यातुनी
असे रचले असते तर हाही एक मतला झाला असता. मात्र, 'केले वजा आहे तुला' ही ओळ वृत्तामुळे तशी असली तरी 'केले वजा आहे तुला' म्हणणे जरा अनैसर्गीक वाटते.
आता तुझे तर मौनही झाले घुमे
अन मागतो मी उत्तरे शब्दातुनी
मौन बोलते ही कवी कल्पना बरीच दृढ झालेली आहे. तिच्या पुढचा टप्पा या शेरात गाठला आहे. आता तर मौनही घुमे झाले. आता तुझे मौनही बोलत नाही किंवा संदेश देत नाही तिथे मी व्यवहार्य शब्दातील उत्तरांची अपेक्षा तुझ्याकडून काय ठेवायची? हा प्रश्न माणूस देवाला उद्देशून, प्रेयसीला उद्देशून म्हणत असावा असा अंदाज करता येईल. 'आरसा' या वस्तूला उद्देशून आहे असे गृहीत धरल्यास एक वेगळी छटा जाणवेल. तसेच कवितेला उद्देशून आहे असेही गृहीत धरून पाहावे. अनेक अर्थांची द्विपदी. अनेक आर्थांमध्ये लागू होणारी द्विपदी! अभिनंदन!
जाताच तू विझले कसे सारे दिवे?
अन दाटला अंधार हा प्राणातुनी?
सामान्य शेर! हा गझलेचा शेर कमी असून कवितेची ओळ वाटते.
भोगीन मी साऱ्या सजा, पण सांग की
अपराध तो केला कुणी दोघातुनी?
'दोघातल्या' या शब्दाला बसवता येत नसल्यामुळे 'दोघातुनी' घ्यावे लागले ही बहुतेक सर्व कवींची अडचण इथेही जाणवली. पण मुद्दा विशेष आहे. फारच विशेष आहे. ( माझ्या मते, 'मी भोगल्या साऱ्या सजा, पण सांग की' हे जास्ती तीव्र वाटावे. गझलेत भावना तीव्रपणे मांडणे अत्यावश्यक असते असे माझे मत आहे. चु. भू. दे̱. घे. )
मी भोगल्या मध्ये 'ऑलरेडी मी आयुष्यभर शिक्षा भोगलेल्या आहेत, आता तरी सांग' असे होते तर 'भोगीन मी' मध्ये एक स्वीकार, एक वचन, एक खात्री, एक तयारी आहे. पण 'सजा भोगल्याचे' दुःख त्यात नाही. 'सजा भोगल्या' जातीलच याची खात्री नाही. कधीतरी असह्य होऊन कवी सजा भोगणे सोडूनही देईल.
माझ्यामते हा शेर गझलेतील सर्वात उत्कृष्ट शेर आहे. यात त्याग तीव्रपणे दर्शवला गेला आहे. 'माझे प्रेमच इतके आहे ( कशावरचेही प्रेम गृहीत धरावे, प्रेयसी, मित्र, आयुष्य, कविता, स्वगत ) की मी नशिबात असलेल्या सगळ्या शिक्षा भोगायला तयार आहे, पण एकदाच, फक्त एकदाच हे तरी सांग की अश्या शिक्षा मिळाव्यात याच्या मुळाशी असलेला अपराध होता कुणाचा? एकदा तरी विचार कर, एकदा तरी अंतर्मुख हो, सत्य बोल'... व्वाह! 'तू फक्त तितकेच मान्य केलेस तरी मला बरे वाटेल' हे त्यातील 'हिडन' विचार. ( तू फक्त तितकेच मान्य केलेस तरी तुझ्यावाचूनचे आयुष्य मी सहज जगू शकेन - हे त्याचे पूर्ण स्वरुप! )
या शेरावरून चित्तरंजन यांचा हा माझा सार्वकालीन आवडता शेर आठवला.
ज्या क्षणास आपले ऋणानुबंध संपले
वाटले किती भकास, वाटले बरे किती
संपूर्ण गझल एकाच स्वभावाची आहे. त्यात मनस्थितींचे निष्कारण वैविध्य कुठेही नाही. त्यामुळे अजिबात रसभंग होत नाही. अत्यंत नियंत्रित असे विचार! गोटीबंदतेकडे मात्र जास्त लक्ष दिलेले वाटत नाही. काही काही शब्द, अक्षरे, अर्थ तोच ठेवून बदलता येतील.
धन्यवाद!