सर्वसाधारणत: मुंबईकरांकडे आपली सतत दुसऱ्याशी तुलना करण्याची वृत्ती आढळत नाही.  जी पुणेकरांच्यात यथेच्छ 
आढळते. (ह्याला न्यूनगंड असेही म्हणावे का? ) एक साधे उदाहरण आहे.  मी पूर्वी एकदा एका मुलाशी याहू मेसेंजरवर 
बोलत होते. तो नोकरी निमित्त मुंबईत राहात होता.  त्याने अचानक पुणे मुंबईपेक्षा चांगले कसे हे सांगायला सुरवात केली. मी क्वचित् पुण्याला जाते त्यामुळे फारसा प्रतिवाद करू शकत नव्हते.  त्याचे सगळे ऐकून घेतले.  नंतर २-३ वेळा याहू 
मेसेंजर वरील संवादात त्याचे तेच तुणतुणे चालू.  संपेचना.  

तुणतुण्यातून जसा एकच सूर निघतो तसा आमच्या पुढील सर्व संवादांमध्ये त्याचा हाच सूर. ऐकायचे तरी किती?  

शेवटी मी वैतागून एकदा म्हटले,  आमच्याकडे रात्री २. ३० ला देखील चहा मिळतो.  पुण्यात काही ठिकाणी दुपारी अडिचला चहा 
मिळणे कठिण.  तो बिचारा खुर्चीतच कोसळला.  परत पुणे - मुंबई विषय काढला नाही.  

(मात्र ह्या माझ्या विधानाला सबळ आधार होता.  माझा एक मित्र कीर्ती महाविद्यालयात रात्री अभ्यासाला जात असे आणि तिथले 
कँटीनवाले मामा मुलांच्या आग्रहाखातर रात्रभर चहा उपलब्ध करून देत असत आणि २-३ वर्षापूर्वी एकदा माझा भाऊ पुण्याला 
गेला होता तेव्हा सकाळी जाताना इथे इडली-चटणी मिळेल असा फलक लोकमान्य नगरात पाहिला.  एक छोटे काम 
उरकून इडली खायला येऊ असा त्याने विचार केला.  परतायला सकाळचे ११. ०० वाजले.  पाहतो तर इडली संपलेली. चहा सकाळी १०. ०० नंतर बनवत नाही असे उत्तर मिळाले.  चटणी संध्याकाळसाठी वापरायची असल्याने विकत मिळणार 
नाही असे बाणेदार उत्तर मिळाले.  हा अनुभव भीषण होता. शेवटी शोध घेता घेता एक बेकरी सापडली व तिथे त्याने 
पाव विकत घेऊन खाल्ला.)  

पैसा कमावण्यासाठी का होईना मध्यरात्री चहा पुरवणारे कँटीन आणि चटणी पण न विकणारे अजब व्यावसायिक ही तफावत 
विलक्षण आहे.  नंतर हा किस्सा मी एका मराठी संस्थ वर केवळ विनोद म्हणून सांगितला तर एका पुणेकराने तिथे त्यानंतर 
सदैव माझ्याशी शत्रुत्व धरले.  हे शत्रुत्व पण अनाकलनीयच म्हणावे लागेल.