वरचा एक प्रतिसाद पाहिला आणि तुमच्या आमच्या सर्वांच्या मनावर असलेल्या "ठराविक साच्यांचा" (इंग्रजी शब्द : स्टीरिओटाईप्स) परिणाम किती पक्का आहे; या पगड्यामुळे आपण कशी घाऊक विधाने करतो ( स्वीपींग स्टेटमेंटस) करतो याचे पुन्हा एकदा प्रत्यंतर आले. अनेक सामाजिक कारणे, पिढ्यानुपिढ्यांचे संस्कार आणि इतर परिस्थितीजन्य कारणे या सगळ्यांचा परिपाक म्हणजे हे साचे. या निमित्ताने असा विचार आला की, असे कितीकिती साचे आपण कुठल्याकुठल्या प्रकारे मनात वागवत असू?
आज तर या निष्कर्षाप्रत यावेसे वाटते की, ज्या ज्या व्यक्तींनी रूढ असे साचे तोडले, त्यांनीच आपल्याला नवा मार्ग दाखवला आहे. "न स्त्रीं स्वातंत्र्यं अर्हती", "हे पाय जिथे जातील तोच माझा स्वर्ग, तेच माझे वैकुंठ आणि तोच माझा कैलास", "पायीची वाहण पायीच बरी" अशा प्रकारची साचेबद्ध विधाने आता हास्यास्पद ठरतात, पण केवळ शंभरच वर्षांपूर्वी हा एक रूढ साचा होता. तीच गोष्ट अशा वर्गाची ज्याला हजारो वर्षांपासून गावकुसाबाहेर ठेवले गेले, पायीच्या वाहणेप्रमाणे वागवले गेले. त्या काळापासून आतापर्यंतच्या काळातला फरक हा असे साचेबद्ध कल्पना धुत्कारून लावलेल्या व्यक्तींमुळे निर्माण झाला. अचानक साक्षात्कार झाल्याप्रमाणे समाज आणि एकूण जग काही बदललेले नाही. असामान्य व्यक्तींच्या धैर्याने आणि नुसत्या धैर्यानेच नव्हे तर रक्ताची, घामाची, अश्रूंची, अथक प्रयत्नांची किंमत देऊन हे साध्य झाले आहे. त्यांनी ज्या अनेकानेक गोष्टी केल्या त्यातली एक ठळक गोष्ट म्हणजे रूढ संकल्पनांना तडा देणे.
काही साच्यांकडे आपण खेळीमेळीच्या नजरेने पाहू शकतो परंतु खेळीमेळीने पाहणे आणि अपमानकारक असे साचे बनवणे यातली सीमारेषा फार फार सूक्ष्म आहे. साच्यांची ही कर्मकहाणी आजची नाही; आणि ती आपल्या देशापुरतीच मर्यादितही नाही. अमेरिकेतल्या शतकापूर्वीपर्यंतच्या गुलामगिरीचा आणि त्यानंतरच्या वंशभेदाचा परिणाम म्हणजे कृष्णवर्णीयांची आर्थिक, सामाजिक स्थिती. आज अमेरिकेत तुम्ही "निग्रो" हा शब्द उच्चारणे म्हणजे आपल्या देशात एखाद्याला "म्हारड्या" म्हणण्यासारखे आहे. "निग्रो" आणि " म्हारड्या" दोन्ही चूकच; पण शंभर वर्षापूर्वी शेंबडी पोरेही हेच म्हणायची. हीच शिकवण होती; हाच साचा होता.
एक उदाहरणच घ्यायचे झाले तर अशा प्रकारचीच गोष्ट कळत नकळत आपण लैंगिकतेच्या बाबतीत रूढ संकल्पनेपेक्षा वेगळी निवड असणाऱ्या व्यक्तिंच्या बाबतीत करतो आहोत. त्यांची थट्टा उडवणारी विधाने करताना होताना आपण पाहतो. भारतासारख्या देशात अजूनही त्यांचा आवाज क्षीण आहे, अजूनही भारतातले कायदे या बाबतीत अन्यायकारक आहेत. पण माझी खात्री आहे, की या बाबतीत बदल होणार. तो होणे अटळ आहे. कायदे बदलतील, लोकांची या गोष्टींकडे पाहण्याची दृष्टी बदलेल. जे इतर साच्यांच्या बाबतीत झाले तेच याही बाबतीत होईल.
मी समलिंगी नाही परंतु समलिंगी व्यक्तींना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार - यात त्यांच्या लैंगिक निवडीबद्दलचा (सेक्शुअल ओरिएंटेशनचा ) अधिकार आलाच - इतर कुठल्याही विषमलिंगी माणसाइतकाच आहे हे नक्की मानतो. ज्या गोष्टीला विकृत असे म्हण्टले जाते आहे , काही व्यक्तींना ती गोष्ट श्वासोच्छवासासारखी आहे. भिन्नलिंगी व्यक्तीबद्दलच्या आकर्षणाचे समर्थन आपण कधी करतो काय? त्यामुळे इथे समर्थन मी करत नाहीच. हे एक सत्य आहे. बस्स. छोट्या प्रमाणात का होईना, पण समाजाचा एक भाग हा असा आहे. पण फॉर द रेकॉर्ड, होय. मी एक भिन्नलिंगाबद्दल आकर्षण असणारी एक व्यक्ती आहे आणि मी समलिंगी प्रवृत्तीचे अस्तित्व मान्य करतो, हे संबंध वैध आहेत असे समजतो. बहुतांशी पाश्चात्य देशात त्यांना जी मान्यता आहे तशी भारतात त्याना कायदेशीर मान्यता हवी हे मत व्यक्त करतो.