'अशी काही एक गोष्ट अस्तित्त्वात असू शकते' हे मान्य करण्याचा खुलेपणा आणि माणसाला 'माणूस' म्हणून वागवायची तयारी असेल, तर नैसर्गिक-अनैसर्गिक, कायदेशीर-बेकायदेशीर इ. गौण व्याख्यांच्या निर्मितीत आणि एकंदर समाजजीवनात अधिकाधिक वस्तुनिष्ठता येऊ शकेल, असे वाटते. लैंगिक निवडीचा अधिकार, समलैंगिकता यांबाबतचा खुलेपणा, त्यायोगे मिळणारी मान्यता यांचा भारतात (पाश्चात्त्य विश्वाच्या तुलनेने) असलेला अभाव व या विषयाबद्दलचे अज्ञान इ. गोष्टी कारणीभूत असू शकतील; पण शेवटी महत्त्वाचे हे की समलैंगिक नातेसंबंधांची निवड करणारी माणसे ही 'माणसे'च आहेत. आणि तदनुसार माणूस म्हणून त्यांना असलेले हक्क, कायद्याचे संरक्षण, त्यांची कर्तव्ये, व्यवसायातील समान संधी इ. इ. बाबतींत कोठेही बाधा यायला नको.

मी स्वतः जरी "स्ट्रेट" असलो तरी माझ्या परिचयातील नि दैनंदिन जीवनात ज्यांच्याशी व्यवसायाच्या ठिकाणी कामामुळे वगैरे जी संवादसाधना/संभाषण होते, त्यातले किमान दोन  जण तरी 'गे' आहेत; आणि त्यांनी ते जगजाहीरही केले आहे. त्या सर्वाना माझ्याप्रमाणेच समान हक्क मिळावेत अशाच मताचा मी आहे. त्यांनाही आपल्याप्रमाणेच स्वतःच्या इच्छेप्रमाणे मोकळेपणे जगण्याचा, आपले छंद व आवडीनिवडी जोपासायचा, मनासारखा व्यवसाय करून चरितार्थ चालवायचा हक्क आहे, असे मला वाटते.

गे/लेस्बिअन् असणे आणि सम/विषमलैंगिक विकृती असणे यांत फरक आहे. सतीश रावलेंनी उल्लेख केलेल्या विकृती 'स्ट्रेट्' लोकांमध्ये नसतातच असे आहे काय? मुळीच नाही. मग समलैंगिकता ही विकृती कशी काय असू शकते?

या बाबतीत समलैंगिकतेच्या डोहात डोकावताना हा उज्ज्वला मेहेंदळेंचा साप्ताहिक लोकप्रभा मधील लेख, तसेच धनंजय वैद्य यांचा कोणार्कच्या मंदिरातील शिल्पे हे अनुभवचित्रण वाचनीय आहे. वर हॅम्लेट म्हणतात त्याप्रमाणे मला या बाबतीत एकूणच तथाकथित समाजमान्य विचारापेक्षा वस्तुनिष्ठ विचार करणे माणूस नि माणुसकीच्या दृष्टिकोनातून अधिक श्रेयस्कर वाटते