'आय लव्ह यू, टू' या साध्यासुध्या इंग्रजी वाक्याचा वाच्यार्थ 'माझेही तुझ्यावर/तुमच्यावर प्रेम आहे' असा होतो, पण तो मुद्दा येथे नाही. अमेरिकन बोलीत काही वेगळ्या परिस्थितींत हेच वाक्य काही वेगळ्या सूचित अर्थानेही वापरले जाते. (या वाक्याची ही अर्थच्छटा अथवा हा वापर - यूसेज अशा अर्थी - खास अमेरिकन आहे आणि अमेरिकेबाहेर तसा तो होत नसावा अशी निदान माझी तरी समजूत आहे. )
या वापरामागील अर्थ समजावून सांगण्याआधी त्यामागची पार्श्वभूमी थोडी स्पष्ट करणे आवश्यक आहे असे वाटते. सामान्यतः कोणी दुसऱ्याला ('माझे तुझ्यावर प्रेम आहे' अशा साध्यासुध्या अर्थी) 'आय लव्ह यू' असे म्हणाले असता उत्तरादाखल (पुन्हा, 'माझेही तुझ्यावर प्रेम आहे' अशा साध्यासुध्याच अर्थी) 'आय लव्ह यू टू' असे म्हटले जाते.
यावरून पुढे जाऊन, कोणी आपल्या तोंडावर आपल्याबद्दल अपशब्द वापरले असता अथवा खोचकपणे बोलले असता, 'माझ्याही तुझ्याबद्दल / तुमच्याबद्दल नेमक्या याच भावना आहेत' या गर्भितार्थानेही 'आय लव्ह यू, टू! ' असे उत्तर दिले जाते. आधी म्हटल्याप्रमाणे, 'आय लव्ह यू टू'चा असा वापर अमेरिकेत होतो, आणि अमेरिकेबाहेरही तो तसा होत असल्यास मला तरी कल्पना नाही, पण हा खास अमेरिकन वापर असावा असे वाटते.