आपला प्रतिसाद हास्यास्पद वाटला. असो. आपल्या प्रतिसादाशी संबंधित शेवटचेच मत मांडतो.
१. निसर्गनिवाड्याचे समर्थन करत असाल, तर धर्म, पुराणे, वेद वगैरेच्या कुबड्या का लागाव्यात बॉ? समलैंगिक व्यक्तीचे अस्तित्त्व ही निसर्गनिवड म्हणून का स्वीकृत नाही तुम्हांला? तुमचा धर्म शरीससंबंधांविषयी जे सांगतो, तेच निसर्गही सांगतो काय? असे असले तर शरीरसंबंध ठेऊनही अपत्य न होणारे दुर्दैवी स्त्री-पुरुष सगळेच नरकात जाणार की हो! आणि समजा त्यांना त्याबद्दल आक्षेप नसले, तर तो घेणारे किंवा घेतला जावा अशी अपेक्षा करणारे आपण कोण?
२. तुमचे मत तुमच्या अनुभवावरून तयार झाले हे मान्य. पण त्यापलीकडे जाऊन तुम्ही एकंदरीतच समलैंगिकतेचे (त्याबद्दल माहिती नाही, हे तुमच्याच प्रतिसादात कबूल असतानाही) जे सामान्यीकरण केले आहे, ते चुकीचेच आहे.
३. सातत्याने विकृती म्हणून जिचा उल्लेख करत आहात, ती सो कॉल्ड् विकृतीची कल्पना तुम्हांस आलेल्या ज्या अप्रिय अनुभवावरून विकसित झाली आहे, तिचा लैंगिकतेशी संबंध शून्य नि मानसिक जडणघडणीशी संबंध जास्त आहे. नको त्या ठिकाणी चोरटे स्पर्श, वखवखलेल्या नजरेने सावजशोधन हे अनुभव स्त्रियांना स्त्रियांकडून नि पुरुषांना पुरुषांकडूनच येतात काय फक्त? नक्कीच नाही. स्त्रियांना पुरुषांकडून नि पुरुषांना स्त्रियांकडून असे अनुभव नक्कीच येतात. कोणत्याही नोकरदार स्त्रीस तिच्या कार्यालयात, लोकलमध्ये प्रवास करताना वगैरे कसे अनुभव येतात हे विचारून पहा, आपसूक कळेल. त्यामुळे तुम्ही ज्या विकृतीची गोष्ट करताय, तिचा समलैंगिक असण्याशी संबंध नाही; तर त्या व्यक्तीची मानसिक जडणघडण, संस्कार, शिक्षण, मूल्ये कशी आहेत, याच्याशी संबंध आहे. त्यामुळे समलैंगिकता म्हणजे विकृती या मानसिकतेतून बाहेर यावेत महाशय!
४. समलैंगिक व्यक्तीचे ज्ञान, अनुभव; तिचे माणूस म्हणून अस्तित्त्व, माणूस म्हणून त्या व्यक्तीस मिळणारे हक्क, कर्तवे, कायदेशीर संरक्षण व सुविधा यांबद्दल तुमच्याकडे मुद्देसूद प्रतिवाद नसताना स्वतःचे (गैर)समज आणि अज्ञान यांचा वापर एखाद्या समूहाच्या सामान्यीकरणासाठी, नि सरसकट त्या समूहास विकृतपणाचे लेबल चिकटवण्यासाठी करू नकात, ही नम्र विनंती.