अमेरिकेतील पोष्ट हापिसाचा एक किस्सा सांगतो.
माझा एक सहकारी मित्र नुकताच भारतातून अमेरिकेत कामासाठी रुजू झाला होता. अमेरिकेत नवीन होता, जवळ गाडी नव्हती, त्यामुळे त्याला लागेल ती मदत करणे, किमानपक्षी दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत त्याला जेवायला बाहेर घेऊन जाणे वगैरे मित्रकर्तव्ये ('वासरात लंगडी गाय शहाणी' या न्यायाने) त्याच्या काहीच महिने आधी अमेरिकेत आलेल्या माझ्यावर आली.
असेच एक दिवस जेवायला दोघेही बाहेर पडलो असता आमच्या मित्राला आपल्याला पोष्टात जायचे आहे याची आठवण झाली. त्याच्या अमेरिकेच्या दुसऱ्या टोकाला राहणाऱ्या मित्राच्या आईने आपल्या मुलासाठी त्याच्याबरोबर भारतातून एक लोणच्याची बाटली पाठवली होती, ती पोहोचती करायची होती. अर्थात बाटली अमेरिकेच्या दुसऱ्या टोकाला पोहोचवायची असल्यामुळे स्वतः जाऊन हवाली करण्याचा प्रश्नच नव्हता. परंतु पोष्टाने लोणच्याची बाटली पाठवता येऊ शकते की नाही याची खात्री नव्हती.
चौकशी करण्यासाठी (आणि जमले तर पोष्टाने बाटली पाठवण्यासाठी) आम्ही पोष्ट हापिसात गेलो आणि काउंटरसमोरील रांगेत उभे राहिलो. खिडकीपाशी पोहोचल्यावर आमचा मित्र चौकशीसाठी पुढे गेला. मला एकंदर व्यवहाराशी काहीच घेणेदेणे नसल्याने मी मागेच रांगेत उभा राहून गंमत बघत होतो.
आता भारतातून नुकतेच आल्यामुळे आमच्या मित्रवर्यांची इंग्रजी अजून भारतीय/ब्रिटिश वळणाचीच होती, आणि अमेरिकन वळणाशी अजून परिचय झालेला नव्हता. त्यामुळे त्याने आपल्या इंग्रजीत 'मी ही बाटली पोस्ट करू शकतो का? ' ('कॅन आय पोस्ट धिस बॉटल? ') असे विचारले. काउंटरमागील कर्मचाऱ्याचा चेहरा मख्ख!
दोनतीनदा त्याने विचारून तीच प्रतिक्रिया मिळाल्यानंतर मला काय प्रकार होत आहे ते कळले, आणि मी मागून 'पोस्ट नाही, मेल म्हणून विचार' म्हणून प्रॉम्प्ट केले असता त्यावर लगेच सहकार्य मिळाले. (तरी बरे, अमेरिकेत 'पोस्ट करणे' याऐवजी 'मेल करणे' प्रचलित असले तरी पोष्ट हापिसाला 'पोस्ट ऑफिस'च म्हणतात! )
अमेरिकेतल्या पोष्ट हापिसात गिऱ्हाईक पत्राचे जे काही करतो त्याला 'पोस्ट करणे' म्हणतात हेच जेथे माहीत नसते, तेथे भारतातल्या पोष्ट हापिसात एखादा पत्ता माहीत नसणे हे त्यापुढे क्षम्य असावे.