आपल्याहून वयाने बऱ्याच लहान असलेल्या व्यक्तीने 'काका', 'काकू', 'मावशी' वगैरे (अर्थातच लिंगसापेक्षतः आणि वैवाहिक स्थिती-सापेक्षतः) म्हणाल्यास त्यात वाईट वाटण्यासारखे काहीही नसावे. संबोधनकर्त्याच्या चपलांत स्वतःस कोंबल्यास हे सहज लक्षात यावे.
अर्थात समवयस्कांकडून (किंवा 'काकू'च्या बाबतीत आपण अविवाहित स्त्री असताना*) असे संबोधन आल्यास थोडे विचित्र वाटू शकते. (मला वाटते लेखिकेचा हा मुद्दा आहे आणि लेखिकेने हे बऱ्यापैकी स्पष्ट केलेले आहे.) परंतु तेही बऱ्याचदा 'त्याचा/तिचा दृष्टिदोष' ('उस की नज़रों का क़ुसूर' अशा अर्थी) म्हणून सोडून देण्यासारखे असावे. (अर्थात जोपर्यंत जाणूनबुजून केलेले नाही याची आपल्याला खात्री असते तोपर्यंत.)
शेवटी हे असे संबोधन विचित्र का वाटते याचा विचार केल्यास हे लक्षात यावे. आपण बऱ्याचदा स्वतःला इतरांच्या नजरेतून पारखत असतो. ('I am not what I think I am. I am not what you think I am. I am what I think you think I am.' वाक्याचा नक्की स्रोत माहीत नाही. कोणी खात्रीलायक माहिती देऊ शकल्यास आभारी राहीन.) दुसरा आपल्याला काय संबोधतो यातून त्या दुसऱ्याच्या मनात आपली जी काही प्रतिमा आहे असे आपल्याला वाटते (त्या दुसऱ्यास नेमके तसेच वाटत असेलच असेही नाही), ती प्रतिमा जर आपल्या स्वतःबद्दलच्या प्रतिमेशी विसंगत असेल, तर असे विचित्र वाटू शकते. अशा प्रसंगी, संबोधनकर्त्याच्या हेतूच्या शुद्धतेबद्दल जर आपल्याला शंका नसेल, तर (१) दुसऱ्याची आपल्याबद्दल काय प्रतिमा आहे यावर आपले काय नियंत्रण आहे, (२) दुसऱ्याची आपल्याबद्दल काय प्रतिमा असावी हे ठरवणारे आपण कोण आणि (३) दुसऱ्याची आपल्याबद्दल काहीही प्रतिमा असली तरी त्याने आपल्याला नेमका काय फरक पडतो, असे तीन प्रश्न स्वतःलाच विचारून आपलाच त्रास बहुधा कमी करता यावा.